Maratha Reservation: संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:20 PM2022-03-02T12:20:39+5:302022-03-02T12:27:36+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले
कोल्हापूर : ‘मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने जुन्याच मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकारने तारखा दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर खासदार संभाजीराजेंनी त्या त्या तारखेला शब्द देणाऱ्यांचा शर्ट पकडावा,’ असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
संभाजीराजेंनी ज्या मागण्या आता केल्या होत्या, त्या कोणतीही खळखळ न करता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या होत्या. दोन वर्षे सलग ६५०- ६५० कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच या मंजूर केलेल्या योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे संभाजीराजे उपोषणास बसले.
महाविकास आघाडी सरकारने नव्याने काही केलेले नाही, जुन्या बंद झालेल्या योजनांना नव्याने मंजुरी दिली एवढेच आहे. तरीही राजे हे तितकं सोपं नाही. तुम्हाला ज्या तारखा दिल्या आहेत, त्या तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर शब्द देणाऱ्यांचे शर्ट पकडा, असे पाटील म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी, आमचा या आंदोलनास पाठिंबा राहील. प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकाच वेळी राज्यात एक हजार आंदोलने केली आहेत.
राज्यपालांच्या वक्तव्यावर मात्र गप्प...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांनी यावर खुलासा केला असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. राज्यपाल जुना इतिहास वाचणारे आहेत, असे पाटील यांनी सांगितले