शक्तिपीठ महामार्गाची नको युक्ती, मंदिरांनाच द्या शक्ती; रस्ते आहेत, सुविधांचे तेवढे बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:43 IST2025-03-12T15:43:19+5:302025-03-12T15:43:49+5:30
निधीच द्यायचा तर प्रत्येक मंदिराला निधी द्या

शक्तिपीठ महामार्गाची नको युक्ती, मंदिरांनाच द्या शक्ती; रस्ते आहेत, सुविधांचे तेवढे बघा
शरद यादव
कोल्हापूर : राज्यातील मोठ्या मंदिरांकडे जाण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग केला जात असल्याचे सरकार सांगत असले, तरी यात कुणाचे हित दडले आहे, हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. शेतकऱ्यांना नागवून, पुराची व्याप्ती वाढवून, पर्यावरणाचा नाश करून महामार्ग बांधा, असा राज्यातील एकही भाविक म्हणणार नाही; पण सरकारला भाविकांना पुढे करून वेगळेच काही साधायचे असल्याचे समोर येते. सरकारला खरंच मंदिराबाबत काही करायचे असेल तर मोठ्या मंदिरांना निधी द्यावा, त्यातून मंदिर परिसरात पायाभूत सुविधा होतील. राहण्याची, खाण्याची, पार्किंगची चांगली सोय होईल, यातून देवाच्या दारात आल्याचे भक्तालाही समाधान लाभेल.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांतील एक शक्तिपीठ आहे. या मंदिर परिसरात एक चांगले स्वच्छतागृह आपण उभारू शकलो नसू, तर विकास काय झाला, याचा विचार करावा. केवळ रस्ते चांगले केले; पण मंदिराजवळ एकही सुविधा धड मिळत नसेल तर अंघोळ न करता नवीन कापडे घालून पावडर लावण्यासारखाच हा प्रकार आहे. ज्योतिबा, बाळूमामा, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरातही कमी-जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे. बालाजीसारख्या सुविधा प्रमुख मंदिरांत उभारल्या तर भाविक सरकारला जरूर आशीर्वाद देतील; पण भाविकांच्या नावावर ठेकेदारांचा खिसा भरण्याचा उद्याेग झाला तर ते कोणीच सहन करणार नाही.
‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी..’ या ओवीमधून संत तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थामध्ये काय असते, तर केवळ दगड आणि पाणी. खरा देव तर जनतेमध्येच असतो. जनतेच्या भल्याचा विचार म्हणजेच देवाची भक्ती. यानुसार सरकारने जागतिक बँकेचे पैसे मिळतात म्हणून भक्तीच्या नावाखाली अनावश्यक विकासाची युक्ती योजू नये. सामान्य माणसाची शक्ती काढून शक्तिपीठ मार्ग करण्याचा शहाणपणा थांबवावा, अन्यथा कोल्हापूरकर शक्ती दाखविण्यास समर्थ आहेतच.
बांधलेली भाकरी किती दिवस पुरणार?
महामार्गात ज्यांची जमीन जाईल त्या शेतकऱ्यांना टाॅपची भरपाई देण्याची ग्वाही सरकार देते; परंतु आपल्या पूर्वजांनी कितीही संकटे आली तरी जमिनीचा तुकडा पोटाला धरून का ठेवला, याचा विचार शेतकऱ्यांनी जरूर करावा. आज दुप्पट, चौप्पट भरपाई मिळते म्हणून जमीन देऊन मोकळे व्हाल. त्यातून गाडी, घाेडे घ्याल; पण नंतर कष्ट करण्याची सवय मोडली की पैसे संपतील अन् रानही नसेल. ‘बांधली भाकरी पुरणार ती किती दिवस?’ ही म्हण एकदा आठवून निर्णय घ्यावा.
कोल्हापूरचे रक्त अजून गोठलेले नाही
शंभर वर्षांपूर्वी आरक्षणाच्या अंमलबजावणीतून सबंध देशाला सामाजिक न्यायाचा संदेश देणारी हीच कोल्हापूरची माती आहे. ऊस अन् दुधाच्या दरासाठी रस्त्यावर उतरून रास्त भाव सर्व राज्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देणारी हीच माती आहे. कोल्हापूरचा अन्यायकारक टोल पंचगंगेत बुडवून राज्यासमोर आदर्श ठेवणारी हीच माती आहे. त्यामुळे प्रचंड बहुमत आहे म्हणून सरकारने शक्तिपीठाचा प्रयोग सत्तेच्या जिवावर दामटण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरचे रक्त अजून गोठलेले नाही, एवढेच ध्यानात ठेवावे.
लढा केवळ ६० गाावांचा नाही..
जिल्ह्यातील ज्या ६० गावांतून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे, तेथीलच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, असा गैरसमज नको. नृसिंहवाडीजवळ पाणी अडले तर कोल्हापुरातील बिंदू चाैकात पाणी येईल, वारणा नदीला फुगवटा आला तर हातकणंगले, पन्हाळा तालुक्यात नदीकिनारा पाण्यात जाईल, दुधगंगा, वेदगंगेचा श्वास काेंडला तर कागल, राधानगरीत तळे होईल, इचलकरंजीसारखे शहरही याला अपवाद नसेल. त्यामुळे ज्याची जमीन जाते तो लढा देेईल, आम्ही केवळ चर्चा करत बसतो, असे म्हणून चालणार नाही.
शक्तिपीठ महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, त्यांची जी भूमिका असेल तीच माझी राहणार आहे. लोकांच्या इच्छेला महत्त्व देणारा मी लोकप्रतिनिधी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता म्हणून आम्ही जिल्ह्यातून हा महामार्ग वगळण्याबद्दल प्रयत्न केले. आता जर शेतकऱ्यांच्या भूमिकेत बदल झाला असेल व त्यांना महामार्ग व्हावा, असे वाटत असेल तर माझा विरोध असण्याचे कारण नाही. सर्व सहमतीने कोणतेही राजकारण न आणता हा विषय हाताळला गेला पाहिजे. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
विकासाच्या दृष्टीने रस्ते होणे ही बाब महत्त्वाची आहे. मात्र, शक्तिपीठ महामार्ग होत असताना कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या मार्गावरील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. लवकरच याबाबत आढावा घेऊन याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल. - डॉ. अशोकराव माने, आमदार
शिरोळसह कोल्हापुरातील शेतजमिनी या बागायती आहेत व शेतकरी अल्पभूधारक आहेत. पर्यायी महामार्ग असताना नवा मार्ग म्हणजे महापुराला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. आम्ही यापूर्वी शेतकऱ्यांसोबत होतो व आजदेखील आहोत व उद्यादेखील राहू. - डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदारमाझा शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही; परंतु यातील त्रुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या शंका निरसन व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे समाधान केल्याशिवाय शक्तिपीठ मार्ग केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या शंकांचे निरसन होऊन मगच शक्तिपीठ महामार्ग व्हावा. शक्तिपीठ महामार्गाला माझा पाठिंबा आहे. - अमल महाडिक, आमदार