भाजप जिंकण्यासाठी कोणत्याही थरास जाईल; लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:53 AM2023-08-22T11:53:40+5:302023-08-22T11:54:23+5:30
पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देश तोडण्याचा कट
कोल्हापूर : गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठी ज्याप्रमाणे पुलवामा- बालकोट आतंकवादी हल्ला घडवून आणला, त्याप्रमाणे २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर टार्गेट केले जाईल. विघातक शक्तीसोबत फिक्सिंग करून या दोन्ही ठिकाणांवर हल्ला घडवून निवडणूक जिंकली जाईल, अशी भीती लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला यांनी सोमवारी व्यक्त केली.
लोकजागरतर्फे ‘पुलवामा- बालाकोट : काही तथ्ये आणि काही प्रश्न’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात व्याख्यान झाले. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे अध्यक्षस्थानी होते. निवृत्त कर्नल सी. जे. रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ऑनलाइन सहभागी होऊन पुलवामा- बालाकोट हल्ल्यातील वास्तव घटना स्पष्ट केली.
मिठीबोरवाला म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात वातावरण तयार झाले होते. चौकीदार चोर है, राफेलकांड, मोठे कर्जदार देश सोडून पळून जाणे असे मुद्दे चव्हाट्यावर आल्याने भाजप पराभवाच्या छायेत होते. म्हणूनच राजकीय पोळी भाजण्यासाठी पुलवामा बालाकोट हल्ला घडू दिला. हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे राजकीय भांडवल केले. इतर मुद्दे बाजूला पडून मोदींच्या बाजूूने वातावरण तयार झाले. निवडणूक जिंकली. त्यानंतर पुलवामा- बालाकोट हल्लासंंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र हे सर्व जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. या हल्यातील सूत्रधार अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी बढती देण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार चोरमारे, निवृत्त कर्नल रानडे यांचे भाषण झाले. जीवन बोडके यांनी प्रास्ताविक केले. निहाल शिपूरकर, प्रा. मेघा पानसरे, चंद्रकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
सभागृह तुडुंब
व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. आसनव्यवस्था अपुरी पडल्याने अनेक श्रोते व्यासपीठावर मांडी घालून बसले होते. माजी राज्यपाल मलिक मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन जॉइन झाल्यानंतर त्यांचे श्रोत्यांनी उभे राहून स्वागत केले.
‘जिंदगी बहादूर है’ गाण्याला दाद
व्याख्यान सुरू असतानाच वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होईपर्यंत बाबा नदाफ यांनी ‘जिंदगी बहादूर है’ हे गाणे गायिले. त्यास श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
तर २०२४ ला लोकसभेत पराभव अटळ
पुलवामा- बालाकोट हल्ल्यातील सत्य समोर आले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणूनच यावर भाजप काहीही बोलायला तयार नाही, असा आरोप मिठीबोरवाला यांनी केला.
देश तोडण्याचा कट
पुलवामा- बालाकोट येथे हल्ला झाला त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक होते. ते ऑनलाइन सहभागी होत म्हणाले, हल्यासंंबंधित मी सत्य बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मला संपर्क साधून गप्प राहण्याचा सल्ला दिला. राजकीय फायद्यासाठी हा हल्ला घडू दिला. सैनिकांच्या मृतदेहांचे राजकारण केले जात आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देश तोडण्याचा कट रचला जाईल.