चंद्रदीप नरकेंनी कुंभी कारखान्याचे वाटोळे केले, परिवर्तन न झाल्यास देवही वाचवणे अशक्य; बाळासाहेब खाडेंचा आरोप
By राजाराम लोंढे | Published: February 9, 2023 02:18 PM2023-02-09T14:18:43+5:302023-02-09T14:44:09+5:30
‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्ज
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कुंभी कासारीची आम्ही सत्ता सोडताना एक रुपयाचेही कर्ज नव्हते. मात्र, गेल्या अठरा वर्षांत चंद्रदीप नरके यांनी कारखान्यावर तब्बल ३०० कोटींचे कर्ज केले. कारखान्याला लागलेली घरघर थांबवण्यासाठी परिवर्तनाची गरज असून तसे झाले नाहीतर ‘कुंभी’चे खासगीकरण होण्यापासून देवही वाचवणार नाही, असा इशारा देत स्वत:च्या आमदारकीसाठी नरके यांनी चांगल्या कारखान्याचे वाटोळे केल्याचा घणाघाती आरोप विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते बाळासाहेब खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
‘कुंभी’च्या सभासदांनी १९९९ ते २००४ या कालावधीत आमच्याकडे सत्ता दिली, त्यावेळी २८ कोटींचे शॉर्ट मार्जिन होते आणि एक लाख ९५ हजार टन साखर शिल्लक होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार करत कारखाना कर्जमुक्त केला. मात्र, पाच वर्षांत पाच अध्यक्ष केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या १८ वर्षात कारखाना डबघाईला आणला. ‘दालमिया’सह परिसरातील साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प ‘बीओटी’वर केला, ते आता कर्जमुक्तही झाले.
मात्र, ‘कुंभी’ने कर्ज काढून प्रकल्प उभा केल्याने आर्थिक ताण आला. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे वेळेत मिळेनात. कामगार सोसायटीचे १८ कोटींचे कर्ज थकल्याने कर्मचाऱ्यांच्या ठेवी अडकल्याने कर्मचारी दुहेरी संकटात सापडले. आम्ही सुरू केलेल्या निवासी शाळेत गेल्या १८ वर्षांत एक इयत्ताही चंद्रदीप नरकेंना जोडता आली नाही. मुले अक्षरश: खुराड्यात असून स्वत:च्या मालकीचे मात्र कारखान्याच्या पैशावर सुरू असलेल्या विद्यानिकेतनमधून ही मंडळी लाखो रुपये घरी घेऊन जात असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला.
कामगारांवर रोजगारला जाण्याची वेळ
‘कुंभी’च्या इतिहासात कामगारांचा पगार कधी थकला नाही. सध्या अकरा महिन्याचा पगार नसल्याने कामावर रजा टाकून दुसरीकडे रोजगाराला जाण्याची वेळ कामगारांवर आणणाऱ्यांना ‘कुंभी’तून हद्दपार करा, असे आवाहन बाळासाहेब खाडे यांनी केले.
‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्ज
यापूर्वी राज्य बँक आर्थिक स्थिती पाहूनच ‘कुंभी’ला कर्ज देत, कारखाना जिल्हा बँकेकडे आल्यामुळेच उसाची बिले देत आहेत. यासाठी आमदार पी.एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळेच कर्ज मिळाल्याचे खाडे यांनी सांगितले.
खुद्द तोडीमुळेच कारखाना सुरू
कारखान्याचे ऊस तोडणी पाळीपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप आडसाली लागणी शिवारात उभ्या आहेत. तोडणी व वाहतूकदारांची बिले व कमिशन वेळेत मिळत नसल्याने कोणी ऊस तोडेना. सध्या केवळ खुद्द तोड सुरू असल्यानेच कारखाना सुरू असल्याचे खाडे यांनी सांगितले.
घरच्यांचाही विश्वास गमावला
चंद्रदीप नरके हे ‘कुंभी’ वाचवू शकत नसल्याने त्यांनी सभासदांचा विश्वास गमावला आहेच, आता घरच्यांचाही विश्वास गमावला आहे. ‘शाहू’ आघाडीच कारखाना वाचवू शकते, हा विश्वास ज्येष्ठ नेते अरुण नरके यांना असल्याने त्यांनी पाठिंबा दिल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.
सत्ता द्या, हे करतो....
- काटकसरीच्या कारभारातून ‘कुंभी’ कर्जमुक्त करू.
- अध्यक्षांसह संचालकांच्या वाहनांवर एक रुपयाही खर्च करणार नाही.
- शेतावरील कर्मचाऱ्यांना कारखान्यात आणू.
- ‘कुंभी’ची शाळा अद्यावत करू.
- ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम
- ऊस विकास योजना राबवू.
- बेणे प्लॉट करणार.