संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

By admin | Published: August 11, 2015 12:52 AM2015-08-11T00:52:28+5:302015-08-11T00:52:28+5:30

यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घोषणा : प्रांताधिकारी कार्यालयात आज संयुक्त बैठक

If there is no dissolution then the movement on Thursday | संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

Next

इचलकरंजी : वीस दिवसांपासून सुरू असलेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप उद्या, बुधवारपर्यंत मिटला नाही, तर गुरुवारी सायंकाळी यंत्रमागधारकांचा मेळावा घेऊन टोकाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा सागर चाळके यांनी दिला. सोमवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.सायझिंग कामगारांचा सुरू असलेला संप हा कामगार नेत्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे चिघळत आहे. यामुळे शहरातील संपूर्ण वस्त्रोद्योग वेठीस धरला जात आहे. परिणामी येथील औद्योगिक शांतताही बिघडत आहे. त्यामुळे याबाबतचा जाब कामगार नेत्यांना सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चावेळी विचारण्यात येईल, असा इशारा रविवारी चाळके यांनी यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, यामुळे वातावरण चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विनापरवाना असा कोणत्याही प्रकारे प्रतिमोर्चा काढू नये, तसेच तुमच्या प्रश्नाबाबत कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची आज, मंगळवारी संयुक्त बैठक प्रांत कार्यालयात घेऊ, त्यावेळी आपण आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी
रात्री उशीर झाल्याने सर्व यंत्रमागधारकांपर्यंत हा संदेश पोहोचला नाही.
परिणामी सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच शिवाजी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक गोळा होऊ लागले. त्यावेळी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी सर्वांना पुन्हा तांबे माळमधील मराठा भवनात जमण्यास सांगितले. त्यानंतर तेथे झालेल्या मेळाव्यात चाळके यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सर्व यंत्रमागधारकांना सांगितली आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करून गुरुवारपर्यंत मुदत देण्याचे ठरविले. प्रशासनाने उद्यापर्यंत तोडगा काढावा; अन्यथा गुरुवारी टोकाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मेळाव्यात यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन संघटनेचे सचिन हुक्किरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

संप काळात ४०७ रुपयांप्रमाणे पगार द्या
कृती समितीची मागणी : सहायक कामगार आयुक्तांना निवेदन
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपास आमचा पाठिंबा असून, संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांतील कामगारांना दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली.
यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. त्यापैकी सोमवारी यंत्रमाग कामगारांचा लाक्षणिक संप होता. कृती समितीने केलेल्या आवाहनाप्रमाणे यंत्रमाग कामगार शाहू पुतळा चौकातून मोर्चाने सहा. कामगार आयुक्त कार्यालयावर आले. समितीचे एक शिष्टमंडळ सहायक कामगार आयुक्त गुरव यांना भेटले. यंत्रमाग कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेले १०,५७३ रुपये किमान वेतन त्वरित मिळावे. वाढत्या महागाईने १५,००० रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. संपामुळे बंद कारखान्यांतील कामगारांना प्रतिदिवशी ४०७ रुपये पगार मिळावा. घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या. त्यावर सहायक कामगार आयुक्तांनी किमान वेतनासाठी क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मोर्चासमोर शामराव कुलकर्णी, दत्तात्रय माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)

Web Title: If there is no dissolution then the movement on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.