प्रवेशपत्रावर छायाचित्र नसल्यास आधार, पॅनकार्ड दाखवा-शिवाजी विद्यापीठाचा पर्याय :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:22 AM2019-03-28T01:22:11+5:302019-03-28T01:22:34+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घ्यावे. ते करता आले नाही, तर या विद्यार्थ्यांनी शासनग्राह्ण ओळखपत्र (आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट) पर्यवेक्षकांना दाखवावे, असा पर्याय विद्यापीठाने बुधवारी काढला.
त्याबाबतच्या सूचना विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णातील संलग्नित महाविद्यालयांना दिल्या आहेत.विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या आणि द्वितीय वर्षातील पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण साधारणत: ३५ टक्क्यांपर्यंत आहे. प्रवेशपत्र आणि पदवी प्रमाणपत्रांतील चुकांच्या दुरूस्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाने बैठक घेतली. त्यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदी उपस्थित होते. त्यामध्ये या तांत्रिक चुकांची माहिती घेऊन ती दुरूस्त करण्याचा निर्णय झाला. त्यासह महाविद्यालयातील प्राचार्य, रजिस्ट्रार अथवा विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रवेशपत्र प्रमाणीकरण करणे, शासनग्राह्ण ओळखपत्र दाखविणे असे पर्याय निश्चित करण्यात आले. या निर्णयानुसार कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाने महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे दिल्या. प्रवेशपत्रांतील त्रुटी, चुकांमुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून व वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठाकडून घेतली जाईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.
संगणक प्रणालीतील त्रुटींचा फटका
संगणक प्रणालीतील त्रुटींमुळे काही प्रवेशपत्रांवर छायाचित्र अपलोड झालेली नाहीत. ही त्रुटी दूर करण्याची सूचना संगणक प्रणाली पुरविणाºया ठेकेदाराला केली आहे. किती विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्याची माहिती संकलित केली जात आहे. तोपर्यंत विद्यापीठाने निश्चित केलेल्या पर्यायांची माहिती महाविद्यालयांना दिली असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, पदवी प्रमाणपत्रांमध्ये मुळात चुकीची माहिती सादर झाल्याने त्यामध्ये चुका झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. त्यांनी विद्यापीठातील दीक्षान्त विभागाशी संपर्क साधावा. त्यांना प्रमाणपत्र बदलून दिले जाईल.