रस्त्यालगतची वृक्षतोड न केल्यास काम बंद पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:03+5:302021-01-10T04:18:03+5:30
गारगोटी : गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीची हानी करणारे परदेशी वृक्ष महामार्गाच्या लगत आहेत. या वृक्षांमुळे जमिनीची अपरिमित हानी ...
गारगोटी : गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीची हानी करणारे परदेशी वृक्ष महामार्गाच्या लगत आहेत. या वृक्षांमुळे जमिनीची अपरिमित हानी होत तर आहेच शिवाय अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. हे वृक्ष नूतनीकरणात न तोडल्यास या महामार्गाचे काम चार दिवसांत बंद पाडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांपासून आम्ही या वृक्षांमुळे नुकसान सहन करीत आहोत. या पसरट झाडांच्या खाली काहीही पीक येत नसल्याने झाडाखालची जमीन नापीक बनली आहे. हे परदेशी वृक्ष असल्याने याचा पर्यावरणालाही काही उपयोग होत नाही. सर्वच बाजूंनी हे वृक्ष तोट्याचे आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याचा गांभिर्याने विचार करावा. येत्या चार दिवसांत हा निर्णय न घेतल्यास या महामार्गाचे काम कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनावर विश्वास भंडारी, युवराज भंडारी, संदीप पाटील, बळवंत कुपटे, पांडुरंग लोहार, नामदेव लोहार, बंडेराव लोहार, लक्ष्मण लोहार, संजय भंडारी बाजीराव भंडारी,मारुती कुंभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.