...तर गाडगीळांचा जाहीर सत्कार करू
By admin | Published: September 21, 2015 11:04 PM2015-09-21T23:04:20+5:302015-09-22T00:10:12+5:30
महापौरांचा पलटवार : घोटाळेबहाद्दरांची नावे जाहीर करण्याचे आव्हान
सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ २००८ ते २०१३ मधील महापालिकेच्या कारभारावर बोलले ते बरे झाले. या काळात स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर कोण होते, कुणाच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू होता, त्यांची नावेही त्यांनी जाहीर करावीत. निष्कारण काँग्रेसला बदनाम करू नये. या काळातील कारभाराची चौकशी करून, गैरकारभार झाला असल्यास महापौर म्हणून त्यांचा सांगलीतील गणपती मंदिरासमोर जाहीर सत्कार करू, असा पलटवार महापौर विवेक कांबळे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. आ. गाडगीळ यांनी महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला, असा सवाल करीत कांबळे म्हणाले की, विरोधी राष्ट्रवादीचे नेते पाचशे कोटींचा निधी आणल्याचे सांगतात, तर गाडगीळ पाचशे कोटींचा घोटाळा झाला म्हणतात. म्हणजे महापालिकेला हजार कोटी मिळाले का? इतका निधी आला असता, तर सांगलीचे लंडन झाले असते, असा टोलाही लगाविला. स्थायी समितीचे ऐनवेळेचे ठराव, ६७ (३०) क खाली झालेली कामे, ड्रेनेज, पाणीपुरवठा, घरकुल योजनेच्या ठेक्याचीही चौकशी झाली पाहिजे. हे ठेके कोणाला देण्यात आले, ते कसे मंजूर झाले, याचीही चौकशी होणार असेल, तर सोन्याहून पिवळे. लेखापरीक्षणात यापूर्वी या योजनेचा पंचनामा झाला आहे. आमदारांनी वेळ काढून त्याचाही अभ्यास करावा. केवळ दंतकथा रचून बेछूट आरोप करू नयेत. झोपडपट्टी फक्त त्यांना मतदानावेळी दिसते. त्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो; पण त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी ते काय प्रयत्न करीत आहेत? महापालिकेवरील कारवाईसाठी बाह्या सरसावण्यापेक्षा थोडी ताकद निधी आणण्यासाठी त्यांनी वापरावी. ड्रेनेज योजनेचे थर्ड पार्टी आॅडिट होऊन त्याचा अहवालही सादर झाला आहे. आता कशाचे आॅडिट ते करणार आहेत. (प्रतिनिधी)
हेच का अच्छे दिन?--महापालिकेचे अनेक प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्याचे पत्र आपण दिले आहे. स्वत: गाडगीळ यांना भेटून शेरीनाल्यासाठी ५६ लाख देण्याची मागणी केली होती; पण याकडे लक्ष देण्यास त्यांना व सरकारला वेळ नाही. जनतेस अच्छे दिनचे स्वप्न दाखवून निवडून आलेल्या गाडगीळांना, हेच काय अच्छे दिन? असा सवाल त्यांनी केला.