काँग्रेससारखा भामटेपणा कराल तर संघष
By admin | Published: November 5, 2014 12:41 AM2014-11-05T00:41:18+5:302014-11-05T00:49:18+5:30
रघुनाथदादांचा सरकारला इशारा : राजू शेट्टी कारखानदारांचे बाहुले असल्याची टीर्का
कोल्हापूर : भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर द्यावा. कॉँग्रेस सरकारसारखेच तुम्हीही भामटेपणा करणार असाल तर रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सरकारला दिला. गेले वर्षभरात कोणत्या वस्तूची महागाई कमी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी तीन हजारांची मागणी २७०० रुपयांवर आणली? यावरून शेट्टी हे कारखानदारांच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली.
नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात उत्पादन खर्च व एकूण नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अशी अपेक्षा आहे. किमान या सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या सरकारने निवडणुकीतील आश्वासने पाळली पाहिजेत. कॉँग्रेस सरकारसारखाच भामटेपणा केला तर संघर्ष अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नवीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आश्वासने पाळावीत, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्या पाच-सहा वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा उत्पादकांचे आंदोलन केले आणि त्यावेळी दोन-चार जागा पदरात पाडून घेतल्या. आताही तसेच आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी धडपड सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. राजकीय स्वार्थापोटी चळवळ चालविण्याचे काम शेट्टी यांनी सुरू केल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याचेही पाटील यांनी सांगितले.
३५०० वरून मागे हटणार नाही
उसाचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी १२ नोव्हेंबरला सातारा येथे ऊस परिषद होत असून ३५०० रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.