corona in kolhapur-कोल्हापुरातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाचे हात जोडून आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:09 PM2020-04-13T15:09:59+5:302020-04-13T15:12:01+5:30
सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोरोनापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कोल्हापूरमधील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले.
संतोष मिठारी
कोल्हापूर : गेल्या १९ दिवसांत मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एका वेगळ्या स्थितीतून गेलो आहे. या स्थितीत असताना वैद्यकीय उपचार पद्धती आणि नियमांचे तंतोतंत पालन केल्याने कोरोनापासून मी बरा झालो आहे. मला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे. कोरोनाची लक्षणे जाणविल्यास संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी पुढे या, घाबरून जाऊ नका. सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोरोनापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कोल्हापूरमधील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले.
हार्डवेअर व्यावसायिक असलेला हा ३२ वर्षीय रुग्ण पुण्यातील रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. दि. २५ मार्चला कोल्हापूरमधील भक्तिपूजानगर येथील बहिणीला भेटण्यासाठी हा रुग्ण आला. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्याला उपचारासाठी पहिल्यांदा सीपीआर आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील दुसऱ्या स्रावाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोनाचे लक्षण असलेला ताप आल्यानंतर पहिल्यांदा मला भीती वाटली. मात्र, बहिणीचे पती आणि त्यांच्या नगरसेवक मित्राच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात तपासणी करून पुढे खासगी रुग्णालयात दाखल झालो. या रुग्णालयातील डॉक्टरांचे उपचार आणि त्यांनी सांगितलेल्या पथ्यांचे तंतोतंत पालन केले. वेळेवर औषधे घेतली. प्रबळ इच्छाशक्ती आणि उपचारांच्या जोरावर मला कोरोनामुक्त झाल्याचा आनंद वाटत आहे.
कुटुंबीय आणि समाजातील अन्य घटकांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तरी प्रशासन, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आणखी काही दिवस मी या रुग्णालयात थांबणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. त्याची माहिती प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी. कोरोनावर मात करण्याबरोबरच त्याच्यापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. प्रशासनाने दक्षता घेण्याबाबत सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन या रुग्णाने केले आहे.
उपचारांदरम्यान हे केले
१) डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे तंतोतंत पालन
२) हलक्या स्वरूपातील आणि साधे जेवण घेतले
३) वेळेवर औषधे आणि नियमित व्यायाम
४) आठ तास पुरेशी झोप घेतली.
५) मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नामस्मरण आणि जप, कुटुंबीयांशी संवाद.
कुटुंबाची चिंता मिटली
माझ्यामुळे बहिणीला संसर्ग झाल्याने मला खूप दु:ख वाटले. माझ्याप्रमाणे तीदेखील लवकरच बरी होईल, असा विश्वास या रुग्णाने व्यक्त केला. मला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबाची चिंता वाढली; पण मी वेळेत आणि योग्य उपचार घेतल्याने माझे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. आता त्यांची चिंता मिटली असल्याचे या रुग्णाने सांगितले.