बाहेरचा ऊस आणल्यास पेटविणार
By admin | Published: June 16, 2015 01:04 AM2015-06-16T01:04:55+5:302015-06-16T01:15:34+5:30
विश्वास नेजदार यांचा इशारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजाराम कारखान्यावर मोर्चा; वादावादीचा प्रकार
कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याची एकही वस्तू पंढरपूर अथवा बेडकिहाळ कारखान्याकडे गेल्यास संचालक मंडळाला चांगलेच कुडपणार, तसेच कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणल्यास ट्रक उलथवून तो पेटवून दिला जाईल, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी संचालक मंडळाला दिला. यावेळी आंदोलक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
शेतकऱ्यांना त्यांच्या ५ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी व त्याचे व्याज त्वरित मिळावे, सन २०१४/१५ हंगामासाठी पाठविलेल्या उसाचे बिल त्वरित मिळावे, उसाचा करार करून घ्यावा, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणू नये या व अन्य इतर मागण्यांसाठी सोमवारी विश्वास नेजदार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, हरीश चौगले, कार्यकारी संचालक आर. सी. पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मोर्चाला सामोरे गेले. त्यांनाच थेट आव्हान देत माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी कारखाना काय तुमच्या बाचा हाय? असा प्रश्न करत धारेवर धरले. कारखाना कर्जमुक्त आहे. कारखान्याचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे, तर ठेवी आणि बिले का देत नाही, असा सवाल केला.
कारखान्यामध्ये पी. जी. मेढे हे कित्येक वर्षांपूर्वी निवृत्त झाले असताना त्यांच्यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये कशाला खर्च करता, असा सवाल करत कारखान्याला दोन-दोन एम. डी. ठेवण्याची गरज नाही. सेवानिवृत्त झालेल्या परंतु पुन्हा कामावर घेतलेल्या अधिकाऱ्यांना का कमी करत नाही, असा सवालही नेजदार यांनी केला. यावेळी आंदोलक शेतकरी व कारखाना व्यवस्थापनात शाब्दिक वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. काही शेतकऱ्यांच्या उसाचा करार जाणून-बुजून केला जात नाही, बावड्यातील ऊस उशिरा तोडला जातो, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या गोंधळातच अध्यक्ष माने यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी मोहन सालपे, नगरसेवक प्रदीप उलपे, अजित पोवार, नितीन पारखे, श्रीहरी पाटील, प्रल्हाद उलपे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बोर्ड मीटिंगपुढे विषय ठेवणार
येत्या १७ तारखेला कारखान्याची बोर्ड मीटिंग आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी स्पष्ट केले. सूडबुद्धीने कोणाचाही करार डावलला जात नाही. साखरेचे दर पडल्याने काहीशी अडचण आहे.
तुमच्या काळातील सभासद
काही सभासदांच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना त्यांना सभासद कसे केले? असा सवाल नेजदार यांनी उपस्थित केला. यावर माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी तुमच्या काळातच असे सभासद झाले आहेत, असे म्हणताच वादाला तोंड फुटले.
कवळी गाजरं...
कारखाना परिसरात चांगला व परिपक्व ऊस उपलब्ध असताना ८ ते १० महिन्यांची कवळी गाजरं (ऊस) रात्रीच्या वेळी आणून त्याने गाळप केले जाते. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो, असा आरोप यावेळी नेजदार यांनी केला.