अस्तिंत्वाला आव्हान द्याल तर आमच्याशी गाठ
By admin | Published: March 10, 2017 12:16 AM2017-03-10T00:16:42+5:302017-03-10T00:16:42+5:30
कल्लाप्पाण्णा आवाडे : पक्षासाठी आजपर्यंत अन्याय सहन केला; पदाधिकारी सत्कार सोहळ्यात आवाडे पिता-पुत्रांनी मन केले मोकळे
इचलकरंजी : आमच्या अस्तित्वालाच जर कोणी आव्हान देत असाल, तर गाठ आमच्याशी आहे. पक्षासाठी आजपर्यंत खूप अन्याय सहन केले, पण आता बस्स झाले. आवाडे गट आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी व्यक्तिद्वेषातून विरोध केला, त्यांचा समाचार घ्यावाच लागेल, असा गर्भीत इशारा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिला.
ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. येथील लायन्स क्लबमध्ये ‘आम्ही आवाडे समर्थक’ यांच्यावतीने हा समारंभ घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले, जिल्हा कॉँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम हे पूर्वीपासून इचलकरंजीकरांनी केले आहे. यापूर्वीच्या नेत्यांमध्येही मतभेद होते; पण त्यांनी पक्षाची हानी होऊ दिली नाही. मात्र, आता ज्या पद्धतीने आवाडे घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो खपवून घेतला जाणार नाही. सध्याच्या राजकारणात सगळीकडच्या आघाड्या चालतात. फक्त आवाडेंची चालत नाही. यावेळी थोडी घाईगडबड झाली; पण पुढे ही समीकरणे चुकणार नाहीत. कॉँग्रेसअंतर्गत आवाडे गट म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
प्रकाश आवाडे म्हणाले, व्यक्तिद्वेषातून पछाडलेल्या कॉँग्रेसमधील काही मंडळींनी नेहमी द्वेषाचे राजकारण केले. त्यातूनच हा उद्रेक झाला. जे झाले, ते योग्यच आहे. जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाची ही नांदी आहे. आम्ही काय करू शकतो, हे आता दाखवून दिले आहे. पुढच्या काळात खूप वेगळ्या पद्धतीचे राजकारण बघायला मिळणार आहे. आता आमची कोणत्याही पक्षाबरोबर बांधीलकी राहिली नाही. ज्यांनी आम्हाला विरोध केला, ते रिंगणात येतील त्यावेळी त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल. राहुलच्या माध्यमातून नव्या पिढीतील राजकारणाला सुरुवात झाली आहे. तरुणांनी पुढील काळात आवश्यक त्या पद्धतीने पावले टाकत सोबत येणाऱ्या सर्वांना गोळा करा.
सगळ्या पक्षातील सगळे आम्हाला चालतात. गत निवडणुकांमध्ये आमच्याच लोकांनी आमचा कार्यक्रम केला. आता त्यांना सुटी नाही. नव्याने तयार झालेली फळी घट्टपणाने बांधायची आहे. कार्यक्रमाचे स्वागत शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले. यावेळी विलास गाताडे, पद्माराणी पाटील, महेश पाटील, शशांक बावचकर, राहुल आवाडे, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)
ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात
आवाडेंनी पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याच्या कारणावरून पक्षाशी फारकत घेत नव्याने ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली.
त्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल आवाडे समर्थकांकडून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असला तरी यामध्ये मंचकावर बहुतांशी कॉँग्रेसचे पदाधिकारी जातीने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत शहर कॉँग्रेसच्या अध्यक्षांनीच केले. याबाबत कार्यक्रमस्थळी चर्चा
सुरू होती.
कॉँग्रेसला सुबुद्धी
ज्यावेळी कॉँग्रेस पक्षाला सुबुद्धी सुचेल, त्यावेळी काय निर्णय घ्यायचा, ते ठरविले जाईल. तोपर्यंत ताराराणी आघाडीच राहील. त्या माध्यमातून आपल्या गटाची
ताकद कार्यकर्त्यांनी वाढवावी, असे
आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
आवाडे गटाची ताकद वाढविणार
आगामी काळात इचलकरंजीसह हातकणंगले, वडगाव व शिरोळ या विधानसभा मतदारसंघांतही आवाडे गटाची ताकद वाढविली जाईल. नव्या राजकारणात नव्याने घडामोडी घडवून आवाडे गटाची ताकद वाढविली जाणार आहे, असे प्रकाश आवाडे यांनी भाषणात नमूद केले.
दादा-अण्णांच्या माघारी आघाडीची नोंदणी
ताराराणी विकास आघाडीची नोंदणी करताना याबाबत आपण माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना न सांगताच केली होती, असे राहुल आवाडे यांनी स्पष्ट करत त्या आघाडीच्या माध्यमातूनच आवाडे घराण्याच्या राजकारणाला बळ मिळाल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
राजू शेट्टी-मिणचेकर
निवडणुकीत खासदार राजू शेट्टी व आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी चर्चा केली. मात्र, वेळ कमी असल्याने ते घडले नाही. आगामी काळात हे समीकरण नक्कीच जुळवून आणून हातकणंगले तालुक्यातील राजकारण केले जाईल, असेही प्रकाश आवाडे यांनी संकेत दिले.