नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्यास मुंबईत उपोषण : चंदगड ग्रामस्थांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:21 AM2018-09-05T00:21:15+5:302018-09-05T00:23:34+5:30
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी आज, मंगळवारी येथे दिला.चंदगड येथील रवळनाथ सभागृहात ग्रामस्थांची बैठक झाली
चंदगड : चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी आज, मंगळवारी येथे दिला.चंदगड येथील रवळनाथ सभागृहात ग्रामस्थांची बैठक झाली
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ, असे सांगितले, तर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे लेखी शिफारस पत्र आल्यानंतर महिनाभरात नगरपंचायतीचा दर्जा देऊ, असे नगरविकास खात्याचे श्री. मोघे यांनी सांगितले. यावरून चंदगडला नगरपंचायत देण्यासंदर्भात शासनामध्येच एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री एक सांगतात व नगरविकास खात्याचे अधिकारी एक सांगतात. त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रश्नावरून चंदगडकरांना शासन खेळवत आहे की काय? अशी शंका आज ग्रामस्थांनी उपस्थित केली. बैठकीत ग्रामस्थांनी आचारसंहिता संपेपर्यंत नगरपंचायतीचा दर्जा शासन देते काय याची वाट पाहू अन्यथा मुंबईत मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा करू. त्यांनी सकारात्मक निर्णय दिला नाही तर आझाद मैदानावर सर्व ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा दिला व चंदगड ग्रामपंचायतीसह येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा टाकण्याचा निर्णय कायम ठेवला.
यावेळी भाजप जिल्हा युवा उपाध्यक्ष समीर पिळणकर, सुरेश सातवणेकर, बाबूराव हळदणकर, चंद्रकांत दाणी, तजमुल फणीबंद, माजी सरपंच अरुण पिळणकर, आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी भास्कर कामत, हिरामणी हुंबरवाडी, दिलावर सय्यद, मनोज चंदगडकर, भाजप चंदगड शहराध्यक्ष योगेश कुडतरकर, आदी उपस्थित होते.
चंदगडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
कृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुबरवाडी यांनी स्वागत करून चंदगड ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये, चंदगडकरांची एकी अभेद्य आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रस्तावामध्ये त्रुटी न काढता ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अन्यथा इथून पुढे होणाºया तीव्र आंदोलनाला शासन जबाबदार राहील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी आचारसहिता संपेपर्यंत शासनाच्या निर्णयाची वाट पाहू अन्यथा चंदगडकरांच्या एकीचे दर्शन शासनाला आझाद मैदानावरच देऊ.