तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही अडथळे पाडू
By admin | Published: March 10, 2016 12:36 AM2016-03-10T00:36:48+5:302016-03-10T01:11:01+5:30
सर्वपक्षीय कृती समिती : शिवाजी पुलाबाबत महापालिकेला इशारा
कोल्हापूर : शंभर वर्षांचे आयुष्यमान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी पूल उभारण्यात येत आहे; परंतु काही झाडे आणि पाण्याच्या हौदामुळे हे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. जर महानगरपालिकेस हौद पाडण्यास जमणार नसेल तर तो नागरिकच पाडतील, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना दिला. दरम्यान, येत्या काही दिवसांत या संदर्भात संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या शिवाजी पुलास नवीन पर्यायी पूल उभारण्याकरिता माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे पुलाचे काम सुरू झाले. आता ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी झाडे तोडण्यास आडकाठी आणली आणि पुढचे काम थांबले आहे म्हणूनच आयुक्त शिवशंकर यांची सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले .
पुलाच्या बांधकामाच्या आड येणारी झाडे, जकात नाका इमारत व पाण्याचा हौद याची सध्या काहीच गरज नाही, असे आर. के. पोवार यांनी सांगितले. पाण्याचा हौद शाहू जन्मस्थळ येथे स्थलांतर करावा, असे बाबा इंदुलकर यांनी सुचविले, तर दिलीप देसाई यांनी तातडीने झाडे तोडली जावीत, असे सांगितले. यावेळी महेश जाधव, अशोक भंडारे, चंद्रकांत यादव, लाला गायकवाड, सुनील देसाई, पद्मजा तिवले, दिलीप देसाई, सुरेश जरग, संभाजी जगदाळे, बाबा पार्टे, अशोक देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)