संशोधन कराल, तर तरुण राहाल

By admin | Published: April 13, 2016 12:49 AM2016-04-13T00:49:24+5:302016-04-13T00:53:03+5:30

राव यांचे प्रतिपादन : शिवाजी विद्यापीठात आर. के. कणबरकर पुरस्कारांचे वितरण

If you do research, then stay young | संशोधन कराल, तर तरुण राहाल

संशोधन कराल, तर तरुण राहाल

Next

कोल्हापूर : वैयक्तिक लाभापेक्षा आपण समाजाला काय देतो ही गोष्ट आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. वयाच्या संशोधनाचा काही संबंध नसतो, संशोधन करीत राहिलात, तर आयुष्यभर तरुण राहाल. वय सर्जनशीलतेच्या कधीही आड येत नाही, असा सल्ला भारतरत्न व रसायनशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. सी. एन. आर. राव यांना दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी विद्यापीठातर्फे डॉ. सी. एन. आर. राव यांना ‘प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. शालिनी कणबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रोख १ लाख ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
राव म्हणाले, वयाच्या १७ व्या वर्षापासून मी संशोधनाला सुरुवात केली तेव्हापासून संशोधनात व्यस्त आहे. आश्चर्याची आणि महत्त्वाची बाब म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापासून माझ्या संशोधनाचे सायटेशन्स व एच इंडेक्स वाढू लागला. याचा अर्थ असा की, वयाचा आणि संशोधन किंवा सर्जनशीलतेचा काहीही संबंध नाही. वयाची कोणतीही मर्यादा न बाळगता मला संशोधन कार्य करता आले याचे मोठे समाधान आहे. संशोधकांनी संशोधकीय सर्जनशीलतेमधील आनंद घ्यावा आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राव म्हणाले, नजीकच्या काळात चार कोटी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. जलव्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठे काम होण्याची गरज व्यक्त केली. आपल्या देशाला कोणत्या क्षेत्रात आघाडीवर न्यायचे याची दिशा तरुणांनी ठरवायची आहे. त्यासाठी विज्ञानाचा आधार घ्यावा. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, प्रा. राव आणि प्राचार्य कणबरकर या दोघांच्या जीवनात कष्टाच्या तत्त्वज्ञानाचे साम्य आढळते. आयुष्यात आपल्याला काय मिळेल यापेक्षा आपण या देश, समाजाला काय देऊ शकतो, याचा ध्यास या दोघांच्या प्रकृतीमधला समान धागा आहे. त्यामुळे प्राचार्य कणबरकर पुरस्कारासाठी निवड समितीने भारतरत्न प्रा. राव यांची एकमताने निवड केली, याचा अतिशय आनंद वाटतो.
प्राचार्य डॉ. बी. ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुंधती पोवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध विभागांतील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणबरकरांवर चित्रफीत
कणबरकर कुटुंबीयांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी अंबाबाईची मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन प्रा. राव यांचा सत्कार केला. अनिता शिंदे यांनी श्रीमती इंदुमती राव यांचा सत्कार केला. यावेळी प्रशांत गिरी यांनी तयार केलेल्या प्राचार्य कणबरकर यांच्या जीवन व कार्याचे दर्शन घडविणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.

Web Title: If you do research, then stay young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.