हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:13+5:302021-02-25T04:29:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफ आदी शासनाने दिलेले शब्द पाळल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून, प्रसंगी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिला. माझ्यावर आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिले माफ करू, दोन लाखांवरील शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी समरजीत घाटगे यांनी बुधवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषण केले. घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शिवार यात्रा काढली. त्यांच्या वेदना खूप आहेत, राज्य शासनाने सव्वा वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. शासनाला दिलेल्या शब्दांचा विसर पडला आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत आहे. राजघराण्याबद्दल सातत्याने उल्लेख होतो, आपण राजघराण्यातील नव्हे तर महाराष्ट्राचा सेवक म्हणून उपोषणास बसल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाला पोलिसांनी रात्री परवानगी नाकारली, आंदोलन होऊच नये, असा प्रयत्न होता, त्यातून थट्टा करण्याची तयारीही काहींनी केली होती. ए. वाय. पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. स्क्रिप्ट कागलमधून आली आणि त्यावर ‘ए. वाय.’ यांनी स्वाक्षरी केली. माझ्यावर कोणाच्या तरी आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल तर थेट बाेलण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही समरजीत घाटगे यांनी दिले.
दरम्यान, दिवसभरात नवोदिता घाटगे, वीरेंद्रराजे घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतराव पवार, अमल महाडिक, बाबासाहेब पाटील, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी भेट देऊन आंदोलनात सहभागी झाले. सायंकाळी सव्वासहा वाजता समरजीत घाटगे यांनी उपोषण सोडले.
जामदार यांचा २५ किलोमीटर दंडवत
भाजपचे सरचिटणीस अजित जामदार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी २५ किलोमीटर दंडवत घातला. अंबाबाई मंदिर ते ज्योतिबा मंदिरापर्यंत दंडवत घालत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी शासनास द्यावी, असे साकडे घातले.
देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा
इरिगेशन फेडरेशन, जय शिवराय किसान संघटना, कुंभार समाज संस्था, शेकाप, ब्लँक पँथर त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध संस्था व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा दिला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनास पाठिंबा दिला.