चिरीमिरीसाठी काम दडपून ठेवाल तर याद राखा : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:49 PM2020-02-10T16:49:52+5:302020-02-10T16:52:01+5:30
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृहातील संपर्क कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. पीरवाडी (ता. करवीर) येथील संजय पोवार, मालुताई शेळके या दिव्यांगांच्या हस्ते व वारकरी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील व ज्येष्ठ नागरिक पांडुरंग चांदेकर (मुरगूड), रामचंद्र माने (कदमवाडी) यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले.
स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी स्वागत केले.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती स्वाती सासने, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रदीप पाटील-भुयेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक महेश जाधव यांनी आभार मानले.