शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:24 PM2024-06-27T12:24:06+5:302024-06-27T12:24:27+5:30

''मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाही''

If you look crookedly at farmers' land for Shaktipeeth highway, keep your eyes averted, Raju Shetty warning | शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम सरकार करत आहे. यापूर्वी मोर्चे काढून सरकारला इशारा दिला आहे, तरीही त्यांची कार्यवाही थांबणार नसेल तर शेतकरी आता गप्प बसणार नाही. आमच्या जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी, तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ कागल ते स्मृती स्थळ कोल्हापूरपर्यंत २२ किलो मीटरची कैफियत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या सांगता करताना त्यांनी राज्य सरकार व साखर कारखानदारांना इशारा दिला.

शेट्टी म्हणाले, पावलो पावली सामान्य माणूस व शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्या राज्यकर्त्यांना शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचे आत्मचिंतन करावे. साखर कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभर आम्हाला फसवले आहे. ऑक्टोबरला हंगाम सुरू करायचा की नाही हे कारखानदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवावे. ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर बघतो कसा हंगाम सुरू करता, असा इशाराही त्यांनी दिला.

‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, आतापर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या मातीतून २५०० किलोमीटर चाललो. आणखी किती चालयायचे? स्वर्गीय प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्यानंतर महाराष्ट्रातील चळवळीत राजू शेट्टी हेच राहिले आहेत. त्यांना जपा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे आदी सहभागी झाले होते.

अशी निघाली पदयात्रा..

पदयात्रेस सकाळी ९ वाजता कागलच्या गैबी चौकातून सुरुवात झाली. कागल - पुणे महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक, शाहू मिल, पार्वती टॅाकीज, गोकुळ हॅाटेल, व्हीनस कॅार्नर, दसरा चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतीस्थळ असे २२ किलोमीटरचे अंतर पदयात्रा काढण्यात आली.

सोमवारपासून कर्जमुक्तीची लढाई

गायीच्या दुधाला प्रतिलिटर सात रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करा यासह शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, या मागणीसाठी सोमवार (दि. १) पासून लढाई सुरू करत आहे. पुसद (यवतमाळ) माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावापासून दौरा सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाही

मागील ५० व १०० रुपये देण्याची जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. आज, पदयात्रेच्या निमित्ताने गावात आलो; पण त्यांच्या दारात गेलो नाही. शेतकऱ्यांना तुम्ही शब्द दिला हाेता, तो पाळा आम्हाला दारात येऊ देऊ नका, असा इशारा प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.

ऊन-पाऊस आणि घामाचा सडा

कागल ते कोल्हापूर पदयात्रेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ऊन, पाऊस अंगावर झेलत व घामाचा सडा टाकत शेतकरी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले होते.

Web Title: If you look crookedly at farmers' land for Shaktipeeth highway, keep your eyes averted, Raju Shetty warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.