विनाकारण आरोप कराल तर आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:48+5:302021-09-05T04:27:48+5:30
उदगाव : केवळ मी महिला असल्याने त्रास देण्याच्या उद्देशाने स्वाभिमानीकडून माझ्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. सर्व कामे ...
उदगाव : केवळ मी महिला असल्याने त्रास देण्याच्या उद्देशाने स्वाभिमानीकडून माझ्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. सर्व कामे नियमाला धरून असून मासिक सभा कायदेशीर आहेत. विनाकारण त्रास देणाऱ्या स्वाभिमानीच्या उपसरपंचासह इतर सदस्यांनी विनाकारण आरोप असेच सुरू ठेवले तर आमरण उपोषण करू, असा इशारा सरपंच कलीमुन नदाफ यांच्यासह सहा सदस्यांनी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, गावच्या हितासाठी मूलभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मासिक सभा कायदेशीर असून सर्व कामांची कागदपत्रे आहेत, तरी स्वाभिमानीचे उपसरपंचांसह इतर आठ सदस्य विनाकारण आरोप करत आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य हिदायत नदाफ हे फुटून स्वाभिमानीमध्ये गेले आहेत. तत्पूर्वी त्यांनी स्वाभिमानीच्या सदस्या सुनीता चौगुले त्यांच्यावर अपात्रतेसंदर्भात तर संदीप पुजारी यांनी हिदायत नदाफ यांच्या अपात्रतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी असून गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी त्यादिवशी म्हणणे मांडू नये यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचे म्हटले आहे. विनाकारण आरोप असेच सुरू ठेवले तर आमरण उपोषण करू असा इशारा सरपंच कलीमुन नदाफ यांनी दिला आहे.
निवेदनावर सलीम पेंढारी, सावित्री मगदूम, अरुण कोळी, सुवर्ण सुतार, दीपिका कोळी, रुक्मिणी कांबळे यांच्या सह्या आहेत.
कोट : विना अंदाजपत्रक टेंडर काढणे, ठरावीक सदस्यांच्या मोबाइलवर सीसीटीव्ही जोडणे यामुळे महिला सदस्यांचा अपमान झाला आहे. त्यावेळी हे सदस्य कुठे होते. स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला वेठीस धरण्यातच महाविकास आघाडी मश्गुल आहे.
रमेश मगदूम, उपसरपंच, उदगाव