लस हवी असेल तर सिरींज विकत आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:18+5:302021-07-29T04:24:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पट्टणकोडोली : कोरोना लस घेण्यासाठी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने लस हवी असेल तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पट्टणकोडोली : कोरोना लस घेण्यासाठी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने लस हवी असेल तर सिरींज विकत आणा, अशी अजब अट ठेवल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनामार्फत लस मोफत देण्यात येत असताना सिरींज विकत आणण्यास सांगून ग्रामस्थांना वेठीस धरण्याच्या या प्रकारामुळे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यानंतर पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरुन सिरींज आरोग्य विभागाकडून देण्यास भाग पाडले.
पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी ग्रामस्थ व पूरग्रस्तांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला १,५०० लस व २०० सिरींज देण्यात आल्या होत्या. त्यापैकी केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांना लसीचे वाटप करुन पट्टणकोडोली गावासाठी तीनशे लसी ठेवण्यात आल्या होत्या. या लसी देताना ग्रामस्थांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी सिरींज विकत आणण्यास सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध केला. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांनी केंद्रावर येत सिरींज विकत का आणायला लावल्या, असा जाब विचारत आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. माळी यांनी तालुका वैद्यकीय कार्यालयातील संगीता गुरव यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, गुरव यांनी अशा कोणत्याही सूचना केल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे माळी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सिरींज देण्यास भाग पाडले.