दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:18 PM2019-12-25T17:18:02+5:302019-12-25T17:20:41+5:30
राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद्र शोधावे लागणार आहे.
कोल्हापूर : राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद्र शोधावे लागणार आहे.
गेल्या महिन्यापासून ३१ डिसेंबरचा बेत आखण्याचे सुरू आहे. गोवा, पन्हाळा, विशाळगड अशा ठिकाणांवर चर्चा सुरू आहे; तर काहींनी आपण पार्टी करायची, निसर्गातील मस्त ठिकाणी जाऊन चुलीवर जेवण करायचे असाही बेत आखला आहे.
पण सावधान! चुकूनही या वर्षी राधानगरी वन्यजीव परिक्षेत्रामध्ये ३१ डिसेंबर रोजी पार्टी करण्यास जाऊ नका. वन्यजीव विभाग व स्थानिक पोलीस, ग्रामस्थ यांच्या वतीने गस्तीपथके तयार करण्यात आली असून, या काळात धरणक्षेत्रात, बॅकवॉटर आणि जंगल क्षेत्रात जेवणावळी करणाऱ्यांवर वन्यजीव कायदा व पोलीस कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे नोंद होणार आहेत.
प्लास्टिक वापरणाऱ्यांवर जाग्यावर दंड
दाजीपूर जंगल परिसरात जेवणावळी व प्लास्टिक टाकणाºयांवर जागेवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षाला तुरुंगाची हवा खावी लागू नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
करडी नजर असणारा परिसर
राधानगरी ते दाजीपूर आणि दाजीपूर ते राऊतवाडी धबधबा या मार्गावर व राधानगरी ते काळम्मावाडी धरण या मार्गावर पोलीस, वन्यजीव खात्याची करडी नजर असणार आहे.