विनाकारण फिराल तर थेट पोलीस ठाण्यात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:52+5:302021-05-15T04:21:52+5:30
कोल्हापूर : उद्या, रविवारपासून जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता, अन्य कोणालाही रस्त्यांवर ...
कोल्हापूर : उद्या, रविवारपासून जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता, अन्य कोणालाही रस्त्यांवर फिरता येणार नाही. असे विनाकारण फिरणारे लोक आढळल्यास त्यांना थेट पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे नोंदविले जाणार आहेत. दोषारोपपत्रही तयार करून त्याच दिवशी त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. पाेलीस, आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा अनेकजण लाॅकडाऊन असूनही रस्त्यांवर विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्याऐवजी आणखी वाढत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही जे लोक रस्त्यांवर विनाकारण फिरतील; त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मास्क नसलेल्या व्यक्ती आणि दुचाकी ताब्यात घेतल्या. आता उद्या, रविवारपासून जे रस्त्यावर विनाकारण फिरतील, त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले जाईल. त्यानंतर दोषारोपपत्र तयार करून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. कोरोना संसर्गाची महामारीची जाणीव व्हावी, याकरिता यापूर्वी नागरिकांना दंड केला. आता त्यांना थेट न्यायालयात हजर केले जाईल. हा आठ दिवसांचा लाॅकडाऊन संसर्गाची साखळी तोडण्यास उपयुक्त राहणार आहे. या काळात आरोग्य यंत्रणा रुग्ण शोधणे, टेहळणी, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात करणार आहे.
यांना रस्त्यावर उतरण्यास परवानगी
- ज्या नागरिकांनी लसीकरिता पूर्वनोंदणी केली आहे, अशांनाच प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाता येईल. त्याचा पुरावा म्हणून मोबाईलवरील संदेश दाखवावा लागणार आहे.
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, त्यांत महापालिका आरोग्य, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, डाॅक्टर, नर्सेस, माध्यमांचे प्रतिनिधी, आदींचा समावेश आहे.
कट्ट्यावर बसणाऱ्यांवरही कारवाई
पेठापेठांसह गल्लीबोळांत सकाळ-संध्याकाळ जे युवक बसतात; गल्लीतच क्रिकेट, फुटबाॅल खेळतात; अशांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यापुढे विनाकारण फिरताना गाडी जप्त झाल्यानंतर ती योग्य कागदपत्रे आणि दंड भरून लाॅकडाऊन उठल्यानंतरच संबंधितांच्या ताब्यात दिली जाईल.