सुविधा हव्यात, तर हद्दवाढीला पाठिंबा द्या

By admin | Published: August 22, 2016 12:55 AM2016-08-22T00:55:40+5:302016-08-22T00:55:40+5:30

ग्रामीण जनतेला आवाहन : आज दसरा चौकात धरणे आंदोलन

If you want convenience, then support the multilayer | सुविधा हव्यात, तर हद्दवाढीला पाठिंबा द्या

सुविधा हव्यात, तर हद्दवाढीला पाठिंबा द्या

Next

कोल्हापूर : शहराप्रमाणे सुविधांचे जाळे ग्रामीण भागातही पसरण्यासाठी ग्रामीण जनतेने गैरसमज दूर करून कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा; तसेच लोकप्रतिनिधींनी मताचे राजकारण बाजूला ठेवून भविष्यातील विकासगंगा रोखू नये, असे आवाहन सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने घेतलेल्या जनजागृती मेळाव्यात केले.
३१ आॅगस्टपर्यंत हद्दवाढीबाबत राज्य शासनाने अधिसूचना न काढल्यास सर्व पदाधिकारी नगरसेवकांसह आमरण उपोषणात सहभागी होणार असल्याचा इशारा मेळाव्याच्या अध्यक्षा महापौर अश्विनी रामाणे यांनी दिला.
हद्दवाढीसाठी येथील मध्यवर्ती बसस्थानक चौकात सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जनजागृती मेळावा झाला. हद्दवाढीच्या सकारात्मक भूमिकेबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे अभिनंदन केले. अधिसूचना तातडीने काढावी, यासाठी आज, सोमवारी दसरा चौकात होणाऱ्या धरणे आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात केले.
यावेळी नामदेवराव गावडे, अनिल चव्हाण यांनी भाषण केले, तर प्रदीप कवाळे यांनी आभार मानले. महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, बाबा पार्टे, नगरसेवक सुभाष बुचडे, बी. एल. बर्गे, आदी उपस्थित होते.
१५ हजार जण धरणे आंदोलनात सहभागी होणार
दसरा चौकातील धरणे आंदोलनात विविध क्षेत्रांतील सुमारे १५ हजार नागरिक सहभागी होऊन हद्दवाढीबाबत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिज्ञा करणार आहेत. बुधवार (दि. २४) पर्यंत हद्दवाढीबाबत अधिसूचना न काढल्यास सुमारे १० पक्षांचे ३५ हून अधिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निमंत्रक आर. के. पोवार यांनी दिला.
गद्दार आमदारांच्या घरांसमोर बोंब मारू
शहरात राहून हद्दवाढीबाबत गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या घरांसमोर बोंब मारो आंदोलन करावे. हेच ग्रामीण जनतेच्या मनात गैरसमज पसरवून दिशाभूल करून विकासासाठी खीळ घालत आहेत, असाही टोला सतीशचंद्र कांबळे यांनी लगावला.
ग्रामीण लोकप्रतिनिधींवर टीका
आम्ही ग्रामीणच्या जमिनी घेणार नाही, अवास्तव कर लादणार नाही, असे आवाहन भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी करत गैरसमज दूर करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान हद्दवाढविरोधी नेते स्वीकारत नसल्याची टीका केली.
विकासाचा विस्तार वाढवा
शहराप्रमाणे परिसरातील गावांत मोठमोठे रस्ते, दवाखाने, महाविद्यालये, आयटी हब, आदी विकासाची गंगा येण्यासाठी ग्रामीण जनतेने गैरसमज दूर करून हद्दवाढीसाठी समर्थन द्यावे. लोकप्रतिनिधींनी भविष्यातील विकासाच्या विस्तारीकरणात अडथळा आणू नये, असेही आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले.
माजी नगरसेवकांचा पाठिंबा
शहराच्या हद्दवाढीसाठी माजी नगरसेवक संघटनेने पाठिंबा दिला. हद्दवाढीचा लढा अंतिम टप्प्यात असून, आज दसरा चौकात होणाऱ्या धरणे आंदोनलात माजी महापौर, माजी सभापतींसह माजी नगरसेवकांनी सहभागी होण्याचेही आवाहन संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केले.


 

Web Title: If you want convenience, then support the multilayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.