दुर्मिळ फुलपाखरु पहायची तर.. चला राधानगरीला ... २ डिसेंबरपासून दिसणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:51 PM2018-11-28T12:51:23+5:302018-11-28T12:53:58+5:30
राधानगरीचा फुलपाखरू महोत्सव रविवार 2 डिसेंबर पासून होणार सुरु.. बायसन नेचर क्लब च्या वतीने दरवर्षी राधानगरी दाजीपूर परिसरात आयोजित
कोल्हापूर : बायसन नेचर क्लब च्या वतीने दरवर्षी राधानगरी दाजीपूर परिसरात आयोजित करण्यात येत असलेला फुलपाखरू महोत्सव यावर्षी रविवार २ डिसेंबर पासून सुरु होत आहे.
राधानगरी परिसर हा जैवविविधतेने समृद्ध परिसर असून फुलपाखरू पतंगाच्या वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजाती येथे आढळतात.नोव्हेबर ते डिसेंबर हा काळ फुलपाखरांसाठी अनुकूल काळ असतो या काळामध्ये खूप प्रमाणात फुलपाखरे आढळतात त्यामुळे 2015 मध्ये येथे महाराष्ट्रातील पहिला फुलपाखरू महोत्सव आयोजित केला होता.त्यावेळी महाराष्ट्रातून अभ्यासक,पर्यटक आले होते.
या महोत्सवातून प्रेरणा घेऊन राधानगरी येथे वन्यजीव विभागाने एक आकर्षक फुलपाखरू उद्यान उभे केले आहे. राधानगरी परिसरात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बायसन नेचर क्लब च्या वतीने यावर्षी 2 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये रोज वेगवेगळ्या
अभ्यासक,विद्यार्थी,पर्यटकांना ग्रुप नुसार फुलपाखरू भ्रमंती व तज्ज्ञ अभ्यासकांकडून फुलपाखरू,पतगविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.यावेळी येणाऱ्या पर्यटकांना राहणे साठी तंबू ची पण सोय करणेत येणार आहे. या काळात शालेय सहली, महाविद्यालयीन सहलींना विशेष मार्गदर्शन या महोत्सवात केले जाणार आहे. फुलपाखरू उद्यान घरी कसे बनवावे, फुलपाखरू संवर्धन, फुलपाखरू दिनचर्या तसेच फुलपाखरू, पतंग याविषयी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन या काळात पर्यटकांना होणार आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी
www.radhanagari.in वर संपर्क करावा असे आवाहन बायसन नेचर क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.