हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:26 PM2023-03-21T12:26:53+5:302023-03-21T12:27:24+5:30
सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा; हाच विरोधकांचा एककलमी कार्यक्रम
कोल्हापूर : निवडणुका आल्या की, राजाराम साखर कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा; हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. पण विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघावं, असा उपरोधिक सल्ला माजी आमदार अमल महाडिक यांनी दिला.
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ टोप, संभापूर, पट्टणकोडोली, रुई, मिणचे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
महाडीक म्हणाले, राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे सुरू आहे, याची सभासदांना खात्री आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आहे.
कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजी रामा पाटील म्हणाले, ज्यांच्या जीवावर तुम्ही संचालक झालात, अध्यक्ष झालात त्यांनाच विसरला ! केवळ स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही आज विरोधकांसोबत गेला आहात. पण ‘राजाराम’चे स्वाभिमानी सभासद तुमच्या या गद्दारीचं फळ तुम्हाला निश्चित देतील, अशा शब्दात सर्जेराव माने यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी सरपंच तानाजी पाटील, धनाजी पाटील, विजयसिंह घोरपडे, दामोदर पाटील, माजी सरपंच पिलाजी पाटील, माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, बाजार समिती सदस्य शिवाजी पाटील, वीरधवल पाटील, डॉ. संजय मिरजकर आदी. उपस्थित होते.