इफकोचा शेतकऱ्यांना दरवाढीचा करंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:17+5:302021-04-09T04:24:17+5:30
कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमुळे इतर कंपन्यापेक्षा ५० रुपयांनी दर कमी करून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपणाऱ्या इफको या कंपनीने आता आजवरच्या ...
कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमुळे इतर कंपन्यापेक्षा ५० रुपयांनी दर कमी करून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपणाऱ्या इफको या कंपनीने आता आजवरच्या इतिहासातील उच्चांकी दरवाढ करून शेतकऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी, १०:२६:२६ या खतांच्या किमती तर पाेत्यामागे ६०० ते ७०० रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात इफको कंपनीने ही कमाल दरवाढ असून यात काही प्रमाणात सूट देण्याबाबतचे धोरण चार दिवसांत निश्चित होईल असे म्हटले आहे.
केंद्र सरकारने युरिया वगळता सर्व खतांच्या किंमतीवरील नियंत्रण उठवले आहे, त्यामुळे कंपन्यांना वाटेल तेव्हा आणि परवडेल तसे दर लावण्याची मुभा मिळाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे या किमतीत फारशी वाढ झाली नव्हती; पण यावर्षी मात्र ही सर्व कसर भरून काढण्याचे कंपन्यांनी ठरवले आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान, बंद पडलेले उत्पादनाचे प्रकल्प, कच्च्या मालाच्या आयातीवर लागलेले निर्बंध, वाढवलेला आयात कर व जीएसटी यामुळे आधीच खत निर्मिती उद्योग अडचणीत आला आहे. त्यात इंधन दरवाढ आणि त्यामुळे झालेल्या मालवाहतुकीच्या व कार्गोच्या भाड्यात झालेल्या वाढीची भर पडली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी भरमसाठ दरवाढीचे अस्त्र बाहेर काढले आहे. एकाच वेळी पोत्यामागे ४२५ ते ७०० रुपयांची वाढ ही पहिल्यांदाच झाली आहे.
चौकट ०१
शेतकऱ्याचे गणित विस्कटणार
लहरी हवामान आणि सरकारच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे पूर्णवेळ शेती कसणेच अवघड बनले आहे. खतांचे दर सातत्याने वाढत आहेत, बियाण्यांचेही दर वाढले आहेत, कीटकनाशके आणि टॉनिक फवारणीचा अतिरिक्त खर्चाचीही भर पडत आहे. मशागतीचे दर वाढले आहेत. या सर्वांतून पीक काढले तर त्याला योग्य दर मिळेल याची शाश्वती नाही. जमिनींना खतांची सवय झाल्याने ती कितीही महाग झाली तरी घ्यावीच लागतात. या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून पूर्ण गणितच विस्कटून जाणार आहे.
चौकट ०२
खत जुना दर नवीन दर वाढ
डीएपी १२०० १९०० ७००
१०:२६:२६ ११७५ १७७५ ६००
१२:३२:१६ ११४५ १८०० ६४५
२०:२०:०:१३ ९२५ १३५० ४२५
चौकट ०३
जुना साठा जुन्याच दराने विक्री
कंपनीने आतापर्यंत पुरवठा केलेला माल जुन्याच दराने विक्री करावयाचा आहे, हे इफको कंपनीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. टनामागे ४८० रुपयांचे मार्जिन वितरकांना कायम ठेवण्यात आल्याचेही म्हटले आहे.
चौकट ०४
प्रतिक्रिया
नवीन दर छापलेला माल येईपर्यंत जुन्या दराने खतांची विक्री करावी याबाबत कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपासून साठा तपासणीही सुरू केली. वाढीव दराने विक्री केल्याचे आढळल्यास कारवाई होणार आहे.
-ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर