आयजीएममध्ये रुग्णसंख्येत वाढ
By admin | Published: March 4, 2017 12:43 AM2017-03-04T00:43:34+5:302017-03-04T00:43:34+5:30
सुप्रिया देशमुख यांची माहिती : प्रसूती शस्त्रक्रिया लवकरच, शासन ताब्याचा परिणाम
इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाने ताब्यात घेतल्यापासून अवघ्या चार दिवसांत बाह्य रुग्णांची उपचार करून घेण्याची संख्या शुक्रवारी २५० वर पोहोचली आहे. याशिवाय पुढील आठवड्यापासून दवाखान्याकडे प्रसूती शस्त्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.
नगरपालिकेला दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे पालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाने ताब्यात घ्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाला दिला होता. रुग्णालय हस्तांतरण करून घेण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न केले. त्याप्रमाणे ३० जून २०१६ ला शासन निर्णय झाला. त्यानंतर शासनाकडे अधिकारी व कर्मचारी असले तरी दवाखान्याकडे होणारा औषधांचा पुरवठा हळूहळू बंद झाल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरविली.
डिसेंबर-जानेवारी महिन्यांत तर दवाखान्याकडील यंत्रणा अक्षरश: ठप्प झाली होती. अशा पार्श्वभूमीवर आता २७ फेब्रुवारीपासून शासनाने दवाखाना हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच दिवशी बाह्यरुग्ण तपासणी व उपचार विभाग सुरू करण्यात आला. तेव्हा त्याचा लाभ सुमारे १२५ रुग्णांनी घेतला होता. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी बाह्यरुग्णांची संख्या १५० व २१६ वर पोहोचली. तसेच दवाखान्याकडील आंतररुग्ण विभागात महिला व पुरुष, असे १७ रुग्ण उपचार घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाल्या, दवाखान्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने दवाखान्याकडील एकेक विभाग सुरू होतील. सहा महिन्यांत आधुनिक यंत्रसामुग्रीने व अधिकारी-कर्मचारी यांनी सुसज्ज असा हा दवाखाना रुग्णांच्या सेवेला तयार होईल. दवाखान्यातून बाह्यरुग्ण विभागाबरोबरच अन्य वैद्यकीय सेवा-सुविधा, तसेच २०० खाटांचा आंतररुग्ण विभाग सुरू होईल. हा दवाखाना सामान्य रुग्णालय म्हणून गणला जाईल.
दरम्यान, दवाखान्याकडे रुग्णांची संख्या वाढावी, यासाठी शुक्रवारी दुपारी अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत असलेल्या शहरातील सहा केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी यांची एक बैठक डॉ. देशमुख यांनी घेतली. बैठकीमध्ये शहरातील विविध भागांत असलेल्या या केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील रुग्ण शासनाच्या दवाखान्याकडे पाठवावेत, असे आवाहन केले. शासनाच्या या रुग्णालयामध्ये अनेक महागडे उपचार मोफत होतात. तर काही शस्त्रक्रिया सुद्धा पूर्णपणे मोफत होत असल्यामुळे याबाबतची कल्पना रुग्णांना द्यावी, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)
‘केईएम’मध्ये बाह्यरुग्ण विभाग शक्य
आरोग्य सेवा देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असल्यामुळे नगरपालिकेमार्फत गावभागातील केईएम दवाखान्याकडे दोन सत्रात बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवता येईल. या विभागाला जोडूनच लहान बाळांना विविध प्रकारच्या रोग प्रतिबंधक लसीकरणाचे केंद्र चालविता येतील. या विभागाकडे आवश्यक असलेले अधिकारी व कर्मचारी सध्या आयजीएम दवाखान्याकडे अधांतरी असलेल्या ‘त्या’ ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांतून निवडता येतील, अशी मागणी काही नागरिकांतून होत आहे.