सहकारमंत्र्यांच्या खुलाशात अज्ञान

By Admin | Published: September 24, 2015 12:55 AM2015-09-24T00:55:07+5:302015-09-25T00:08:16+5:30

हसन मुश्रीफ यांचा पलटवार : महापालिका निवडणुकीपर्यंत वाद धगधगणार

Ignorance | सहकारमंत्र्यांच्या खुलाशात अज्ञान

सहकारमंत्र्यांच्या खुलाशात अज्ञान

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ््याबाबत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या खुलाशातून त्यांच्या अज्ञानाचे दर्शन होत असल्याचा पलटवार बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
सहकारमंत्र्यांनी मुश्रीफ यांच्या आरोपाचे खंडन करणारे निवेदन मंगळवारी प्रसिद्धीस दिले होते. त्यास मुश्रीफ यांनी पुन्हा बुधवारी प्रत्युत्तर देऊन हा वाद महापालिका निवडणुकीच्या निकालापर्यंत धगधगताच राहील, याची व्यवस्था केली.
मुश्रीफ पत्रकात म्हटले आहे, ‘शिवाजी चौक तरुण मंडळाच्या गणेश देखाव्याच्या उद्घाटनावेळी सहकारमंत्र्यांनी ‘फुरफुरणे’, ‘आडवे आलात तर आडवे करू,’ अशी वक्तव्ये केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेची फेरचौकशी व राज्य बँकेच्या चौकशीबाबत पत्रकार प्रतिक्रिया विचारत होते म्हणून भूमिका सांगितली. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी एवढे हळवे व अस्वस्थ होणे हे आश्चर्यजनक आहे.सहकारमंत्री ‘घोटाळा’ हा शब्द सातत्याने उच्चारून जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या भांडणामध्ये सहकार कायदा ‘कलम ८८’ अन्वये चौकशी झाली. चौकशी अहवाल तयार झाला इतके घोटाळे त्यामध्ये होते तर उच्च न्यायालयाने स्थगिती का दिली..? शासनावर ताशेरे का झाडले..? बँकेमध्ये तारण, विनातारण कर्जामुळे बँकेचे नुकसान झाले, असे आरोप आहेत, त्यामध्ये घोटाळ््याचा संबंध काय? ते ही उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सहकारमंत्र्यांनी निकाल व्यवस्थित वाचला असता तर असे विधान केले नसते, त्यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले नसते.
‘जिल्हा बँकेची कर्जमाफी रद्द झाली तोही १०० कोटींचा घोटाळा होता,’ असे विधान करून सहकारमंत्री ४८ हजार शेतकऱ्यांची जी अपात्र कर्जमाफी झाली आहे त्यांचा अपमान करत आहेत.
कमाल मर्यादा मंजुरीपेक्षा जादा घेतलेल्या कर्जाची माफी रद्द झाली त्यामध्ये संचालकांचा घोटाळा सहकारमंत्र्यांना कुठून दिसला..? सहकारमंत्र्यांच्या या विधानामुळे त्यांचे सहकाराबाबतचे ज्ञान अगाध असल्याचे दिसते.
सहकारमंत्र्यांचा मी आभारी आहे. माझ्या विनंतीनुसार त्यांनी आज, गुरुवारी मंत्री समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली. एफआरपीसाठी जो शेतकऱ्यांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्याबद्दल शरद पवार यांचे प्रयत्न सार्थकी लागले, याबद्दल सहकारमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही ते सत्य आहे हे त्यांनी मान्य केले. सहकारमंत्री फक्त राजकारणच करत नाही तर सत्याला सत्य म्हणण्याचे धाडसही दाखवतात, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सीबीआय चौकशी कराच
जिल्हा बँकेतील शाखेचे अपहार व कागल शाखेच्या अपहाराची सीआयडी चौकशी झाली आहे. सीबीआय किंवा योग्य वाटेल त्या यंत्रणेमार्फत पुन्हा तपास करून घ्यावा. बँकेचा अध्यक्ष म्हणून माझे पूर्ण सहकार्य राहील, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आकाश-पाताळ एक करूनही..
बँकेची लोकशाही मार्गाने निवडणूक झाली, संचालक मंडळ निवडून आले. सहकारमंत्र्यांनी आकाश-पाताळ एक करूनही मी अध्यक्ष झालो, असे असताना पुन्हा फेरचौकशी करण्याची घोषणा म्हणजे सूडनाट्य नव्हे तर काय..?
राज्य बँकेतही असेच आरोप आहेत. मी स्वत: राज्य बँकेच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्यासाठीच ही चौकशी लावलेली आहे, हे सहकारमंत्र्यांच्या विधानावरून दिसून येते.

Web Title: Ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.