शेतकऱ्यांमधील अज्ञानाचा विकास संस्थांकडून गैरफायदा, पाच संस्थांत कोट्यवधीचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:13 PM2022-08-25T12:13:28+5:302022-08-25T12:14:01+5:30
क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे
काेल्हापूर : शेतकऱ्यांमधील अज्ञान व सचिवांवर गरजेपेक्षा ठेवलेला अधिक विश्वास यामुळेच सहकारी संस्थांमध्ये अपहार होताना दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील पाच मोठ्या विकास संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले आहेत. संबधित दोषींवर अपहार रकमेबाबत फौजदारी झाली, संस्थेवर कलम ८८ ची कारवाई झाली. मात्र, वसुलीचे काय? कायदेशीर प्रक्रियेत वसुली अडकली आहे.
सहकारी संस्थांमुळे कोल्हापूरची प्रगती झाली. खऱ्या अर्थाने सहकारामुळेच कोल्हापूर जिल्हा समृध्द झाला. कोल्हापुरातील सहकार चळवळ आजही महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. मात्र, काही अपप्रवृत्तीमुळे सहकार चळवळ काहीसी बदनाम होताना दिसत आहे. विकास संस्था या ग्रामीण भागातील अर्थवाहिन्या आहेत. मात्र, काही तालुक्यांत या वाहिन्या खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच दीड वर्षात करवीर, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले तालुक्यातील पाच संस्थांमध्ये कोट्यवधीचा अपहार झाला आहे. संबधितांवर कारवाई झाली, मात्र वसुली झालेली नाही. एखाद्या संस्थेत अपहार झाला तर दहा-दहा वर्षे वसुली होत नाही. परिणामी, संस्थेचे कामकाज ठप्प होतेच. मात्र, यामध्ये शेतकरी अडकतो.
क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे
गावातील अनेक शेतकरी विकास संस्थेकडून नियमित कर्ज उचल करतात असे नाही. शासनाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने संबंधित व्यक्तीच्या क्षेत्रावर कर्ज उचल करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी जागरुक राहिले पाहिजे.
गवती जमिनीवर उसाची उचल
वास्तविक उभ्या पिकांवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकांचे आहे. मात्र अनेक संस्थांमध्ये गवती जमिनीवर ऊस दाखवून पीक उचल केली जाते.
शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी...
- कर्जाची उचल करताना मंजुरी आणि उचलीची खात्री करावी.
- पीक कर्जाचे पैसे भरताना त्याची पावती घेणे व ती जतन करून ठेवावी.
- संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर तसा दाखला घेतला पाहिजे.
- साखर कारखान्यांकडून परस्पर वसुलीदार येत असेल तर त्याची वेळेत खातरजमा करावी.
या संस्थांत झाला अपहार -
- विठ्ठल विकास दिंडनेर्ली, ता. करवीर.
- विठ्ठल विकास, उंड्री ता. पन्हाळा
- रवळनाथ विकास, मुगळी ता. चंदगड
- शिवक्रांती विकास, सावर्डे ता. हातकणंगले
- दत्त विकास, सावर्डे ता. हातकणंगले
अपहार झालेल्या संस्थांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मुळात शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार केला पाहिजे, चुकीचे आढळत असेल तर संबंधित निबंधक कार्यालयात कळवले पाहिजे. - प्रदीप मालगावे (सचिव, काेल्हापूर जिल्हा देखरेख संघ).