मसाई पठाराच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष

By admin | Published: November 3, 2016 12:12 AM2016-11-03T00:12:20+5:302016-11-03T00:12:20+5:30

पर्यटकांतून नाराजी : विकासापासून आजही वंचित

Ignore the beauty of the Masai Plateau | मसाई पठाराच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष

मसाई पठाराच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष

Next

पांडुरंग फिरंगे ल्ल कोतोली
रंगी बेरंगी फुले.. हिरवागार विस्तीर्ण सपाट पठार.. सतत वाहणारा वारा ... पांडवकालीन लेणी ... इतकं सारं असूनही केवळ राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मसाई पठार आजही विकासापासून वंचित राहिले आहे. यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांच्या मध्यभागी व पन्हाळगडापासून पश्चिमेला काही अंतरावर असलेले मसाई पठार पांडवकालीन लेण्यांनी सजलेले असल्याने सध्या पर्यटकांना खुणावू लागले आहे.
हे पठार सुमारे ९१३ एकरांपेक्षा जास्त जागेत विस्तारलेले आहे. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळा पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच मसाई पठाराकडे वळतात. पठारावरील प्रत्येक लहान-मोठ्या दरीत जिवंत पाण्याचे झरे कायमस्वरूपी वाहतात. येथील नयनरम्य निसर्ग सर्वांना खुणावत असतो. लहान-मोठ्या दऱ्या, उंच कडे, रिमझिम पाऊस, थंड वारा, दाट धुके, अंगाला झोंबणारा गार वारा हे तर नित्यनियमाने पाहायला मिळते.
पावसाळ्यात उगवणारी अनेक आकर्षक फुले, रंगीबेरंगी वेल आणि धरतीने पांघरलेला हिरवा शालूच जणू अशा आल्हाददायक वातावरणामुळे तरुणाईची मसाई पठारावरील सहल म्हणजे एक पर्वणीच असते. याच पठारावर मसाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. जवळच ऐतिहासिक पांडवदरा असून, जांभळ्या दगडामध्ये कोरलेली पांडवकालीन लेणी सर्वांचे आकर्षण आहे. येथे एकूण २० गुहा आपले अस्तित्व टिकवून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ असणाऱ्या पन्हाळगडावरून सिद्धी जोहारच्या वेढ्यातून निसटून याच मसाई पठारावरून विशाळगडाकडे प्रयाण केले होते.
प्रत्येकवर्षी पावसाळ्यात भारतीय छात्रसेनेच्या शिवाजी ट्रेलट्रेक मोहिमेचा मार्गही या पठारावरून जातो. तर शिवप्रेमी संघटनांचा पदभ्रमण मार्गही पन्हाळा-मसाई पठार-विशाळगड असा आहे. पठाराच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध असे शाहूकालीन चहाचे मळे आहेत. राजर्षी शाहू महाराजांची ही कल्पना जगप्रसिद्ध असून इंग्लंडला ‘पन्हाळा फोर्ट टी’ या नावाने चहा पाठविण्याची सोय त्यावेळी शाहू राजे यांनी येथे केल्याची माहिती दस्ताऐवजात वाचावयास मिळते. पठारावरील मसाई देवस्थान जागृत असल्याने कोल्हापूरसह सांगली व कर्नाटकातून भक्त पठारावर येत असतात. मसाई पठाराच्या पश्चिमेला अवघ्या काही अंतरावर व बांदिवडे गावच्या डोंगरात प्राचीन काळातील लग्नाच्या वऱ्हाडातील माणसांची दगडी मूर्ती तयार झालेली पाहावयास मिळत आहे.
पाठपुरावा नाही
येथील पठारावरील विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून पाठपुरावा करू, असे आजतागायत येथील लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली; पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
मसाई पठारावर दसऱ्याला मोठी यात्रा भरते. यावेळी कोतोली, पन्हाळा, कोल्हापूर, शाहूवाडी, तसेच १२ वाड्या, आदी गावांतील भक्तगण येतात. सासनकाठ्या नाचवितात. खेळणी, पाळणे, त्यांनतर दसऱ्याचे सोने वाटपाचा कार्यक्रम केला जातो.
या पठाराच्या आराखड्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १६ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये मंजूर केले असल्याचे बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.
वेळीच या पठाराकडे लक्ष दिले, तर पर्यटक कास पठाराऐवजी मसाई पठाराकडे गर्दी करू लागतील, हे मात्र निश्चित!
 

Web Title: Ignore the beauty of the Masai Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.