जिल्हा परिषदेचे उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष
By admin | Published: June 18, 2016 12:35 AM2016-06-18T00:35:02+5:302016-06-18T00:41:59+5:30
‘स्थायी’त आरोप : भाडेकरू न्यायालयात गेल्याचे ठेवले अंधारात
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या भाऊसिंगजी रोडवरील इमारतीमधील भाडेकरू न्यायालयात गेल्याबाबत प्रशासनाने अंधारात ठेवले. उत्पन्नवाढीसाठी गंभीरपणे लक्ष दिले जात नाही, असा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषद वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप सदस्य धैर्यशील माने, संजय मंडलिक यांनी केला. ते म्हणाले, प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी होत आहे. व्याजावर परिषद चालविण्याची वेळ आली आहे. भाऊसिंगजी रोडवरील इमारतीचा विकास झाल्यास चांगले उत्पन्न मिळणार आहे; परंतु या इमारतीमधील आताचे भाडेकरू न्यायालयात गेल्याची माहिती प्रशासनाने सदस्यांना दिली नाही.
बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या जागेचा विकास करता येत नाही. परिणामी जिल्हा परिषदेचे नुकसान होणार आहे. त्या विषयावर सर्वच सदस्यांनी बांधकाम, सामान्य प्रशासनास टीकेचे लक्ष्य केले. मात्र या दोन्ही विभागांचे अधिकारी एकमेकांवर विषय ढकलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत राहिले. शेवटी विधी विभागाकडून न्यायालयात गेलेल्या भाडेकरूंशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
माने म्हणाले, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप दरवर्षी होत असतो. साहित्याची कंपनी ठरविण्यात पारदर्शकता नसल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना साहित्य न देता पैसे थेट खात्यावर जमा करावेत. अपंग कल्याण निधीतील लाभाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासनाचा नियम झाला आहे. त्याच धर्तीवर सर्वच विभागांचे पैसे लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावेत. या विषयावर चर्चा झाली. खात्यावर जमा केल्यानंतर लाभार्थी साहित्य न घेता पैसे खर्च करतील, असाही एक मतप्रवाह समोर आला. मात्र साहित्य खरेदीत ‘ढपल्या’ची चटक लागणारे काहीजण त्याला विरोध करण्याच्या मानसिकतेत राहिले. त्यामुळे यावर एकमताने निर्णय झाला नाही. २२ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचे ठरले.
सभापती अभिजित तायशेटे, सदस्य हिंदुराव चौगुले, भाग्यश्री पाटील, बाजीराव पाटील, उमेश आपटे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.