कुलसचिवांचे प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष
By admin | Published: July 17, 2016 12:47 AM2016-07-17T00:47:57+5:302016-07-17T01:03:07+5:30
बाबा सावंत : शिवाजी विद्यापीठ सेवक संघातर्फे आंदोलन; उद्या काळ््या फिती लावून काम
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे सेवक संघाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सकारात्मक आहेत; मात्र प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे त्या मागण्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता, सेवक संघ व कुलगुरू यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे प्रशासना विरोधात सेवक संघातर्फे उद्या, सोमवारपासून काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी विद्यापीठात शनिवारी सेवक संघातर्फे दुपारी दोन वाजता द्वारसभा झाली. त्यानंतर सेवक संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, सेवक संघाच्या सभासदांचे शासन स्तरावरील व वैयक्तिक असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने सेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार, चर्चा करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या बाबतीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासोबत सेवक संघाची बैठक झाली. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कुलगुरुंनी सकारात्मक निर्णय देऊनही प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे वेळकाढू धोरण राबवीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन कोणताच प्रयत्न करीत नसल्याचे चित्र दोन वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सेवक संघास आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही.
महासंघाचे सचिव मिलिंद भोसले म्हणाले, सेवक संघाने आंदोलन करताना विद्यार्थ्यांची परीक्षा, त्यांचे निकाल, प्रवेश प्रक्रिया या सर्वांचा विचार करून त्यांना वेठीस न धरता आता हे आंदोलन उभारले आहे.
यावेळी सेवक संघाचे निमंत्रक रमेश पोवार, अरुण वणिरे, सुरेश पाटील, विशांत भोसले, राम तुपे, विष्णू खाडे, देवयानी यादव, प्रणिता यादव, वर्षा माने, आदी उपस्थित होते.
असे होणार आंदोलन
दि. १८ ते २२ जुलैदरम्यान प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. या दरम्यान मागण्यांबाबत कोणतीच सकारात्मक पावले उचललेली दिसून न आल्यास २५ जुलैपासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
द्वारसभेद्वारे आंदोलनाची दिशा
शिवाजी विद्यापीठ सेवक संघातर्फे अध्यक्ष बाबा सावंत यांनी शनिवारी दुपारी दोन वाजता शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या दोन वर्षांच्या आंदोलनाचा आढावा घेतला. प्रलंबित प्रश्न न सुटल्याने उद्या, सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय मांडण्यात आला. त्याला सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी सेवक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.