रिक्षाचालकाच्या मुलाची ‘आयआयटी’तून पीएच. डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:15 PM2018-11-18T23:15:07+5:302018-11-18T23:15:11+5:30
कोल्हापूर : येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या अनिकेत वसंतराव कातवरे या युवकाने जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्याच्या ...
कोल्हापूर : येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या अनिकेत वसंतराव कातवरे या युवकाने जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर आयआयटी, पवईतून पीएच. डी. पदवी मिळविली आहे. पीएच. डी. साठी त्याने पर्यावरणपूरक डांबराबाबत संशोधन केले आहे. या यशाद्वारे त्याने रिक्षाचालक असणारे त्याचे वडील आणि गृहिणी असणाºया आई अश्विनी यांच्या कष्टाचे सार्थक केले आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेत याचे प्राथमिक शिक्षण शहरातील महानगरपालिकेच्या खर्डेकर विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण शाहू विद्यालयात झाले. बारावीनंतर त्याने सांगलीतील वालचंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी पदवी मिळविली. पुढे आयआयटी, खरगपूरमधून एम. टेक. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुंबईतील आयआयटी पवईमध्ये पीएच. डी.चे संशोधन सुरू केले. सिव्हिल इंजिनिअरिंगमधील ट्रान्स्पोर्टेशन इंजिनिअरिंगमधून त्याने पीएच. डी. मिळविली. यासाठी त्याने रस्तेबांधणीसाठी उपयुक्त ठरणाºया पर्यावरणपूरक डांबरनिर्मितीबाबत संशोधन केले. डांबराची प्रत, त्याचे तापमान योग्य राखणे, ते वापरण्याचे प्रमाण, आदींची मांडणी त्याने या संशोधनात केली आहे. त्याला दि. ११ आॅगस्टमध्ये आयआयटी, पवईकडून पीएच. डी. प्रदान केली.
शिक्षणात चांगल्या गुणांच्या जोरावर मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे महाविद्यालयीन ते पीएच. डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.