इचलकरंजीतील पाच महिन्यांच्या ‘विराज’ला जीवदान, सीपीआरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातील मोठा ट्युमर काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:01 PM2017-12-06T16:01:20+5:302017-12-06T16:08:43+5:30
इचलकरंजी येथील पाच महिन्यांच्या विराज विनोद कल्ले या चिमुकल्याला सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन जीवदान दिले आहे. त्याच्या पोटामधील १५ बाय १५ सेंटीमीटरचा मोठा ट्युमर हा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे आणि डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : इचलकरंजी येथील पाच महिन्यांच्या विराज विनोद कल्ले या चिमुकल्याला सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन जीवदान दिले आहे. त्याच्या पोटामधील १५ बाय १५ सेंटीमीटरचा मोठा ट्युमर हा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे आणि डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. मिरगुंडे म्हणाले, विराजचे पोट जन्मजात फुगलेले होते. ते दिवसेंदिवस वाढत होते. त्याचे वजन अपेक्षितरित्या वाढत नव्हते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या आई-वडीलांनी विविध रुग्णालांमध्ये त्याची तपासणी केली.
विराज विनोद कल्ले
यामध्ये त्याच्या पोटातील मोठ्या आतड्याच्या बाजूला, मूळांशी १५ बाय १५ सेंटीमीटर इतका मोठा ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यावरील उपचार अथवा शस्त्रक्रियेचा खासगी रुग्णालयातील खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जाणारा होता. त्यासह संभावित दुष्परिणामांची कल्पना घेऊन त्यांनी विराजला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयातील शल्यचिकीत्साशास्त्र विभागात १७ नोव्हेंबरला दाखल केले.
या विभागातील डॉक्टरांच्या पथकाने सर्व तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार २३ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया केली. यानंतर विराज पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला आता श्वास घेण्यास काही अडचणी होत नाही. त्याचे खाणे सुधारले आहे. तो घरी पाठविण्यास तयार झाला आहे.
या पत्रकार परिषदेवेळी विराजचे वडील विनोद आणि आई मनिषा यांनी पुष्पगुच्छ देऊन राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. मिरगुंडे, हिरुगडे आदींचे आभार मानले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. वसंतराव देशमुख, मधुर जोशी, शशिकांत राऊळ आदी उपस्थित होते.
दुर्मिळ स्वरुपाची शस्त्रक्रिया
विराज याला जन्मजात केशवाहिनांची गाठ होती. ती काढण्याची शस्त्रक्रिया दुर्मिळ आणि गुंतागुंतीची इतकी मोठी गाठ पोटामध्ये असताना शस्त्रक्रिया करणे मोठी जोखीम होती. ती करताना आतडे कापून पुनर्रजोडणी करणे, शौचाची जागा तात्पुरती पोटावरती काढणे, रक्तस्त्राव, शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटर लावावा लागणे असे धोके होते, असे डॉ. हिरुगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, हे धोके असतानाही पूर्ण कौशल्याने शस्त्रक्रिया केली. यात अतिशय कमी रक्तस्त्राव झाला. शौचाची जागा पोटावर काढावी लागली नाही.
या गाठीमुळे विराजला खूप त्रास होत होता. निपाणी, सांगली आदी ठिकाणच्या खासगी रुग्णालयात आम्ही दाखविले. मात्र,तेथील खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. त्यामुळे आम्ही सीपीआरमध्ये आलो. येथील डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करुन आमच्या बाळाला जीवदान दिले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सीपीआरमध्ये आम्हाला चांगली सुविधा आणि डॉक्टर, नर्स यांचे सहकार्य मिळाले.
-विनोद कल्ले
विविध पातळीवर अभ्यास करुन डॉक्टरांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यासह शल्यचिकित्साशास्त्र आणि दंतचिकित्साशास्त्र विभागाने एकत्रितपणे काम करुन कर्करोगावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून रुग्णांना दिलासा दिला. डॉक्टरांची ही कामगिरी सीपीआरचा नावलौकीक, विश्वास वाढविणारी आहे. लवकरच सीपीआरमध्ये समाजसेवा अधीक्षकांचा स्वतंत्र कक्ष सुरू करणार आहे.
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
शस्त्रक्रिया करणारे पथक
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिरुगडे, विजय कस्सा, हरीश पाटील, के. के. मेंच, मधुर जोशी, डॉ. नीता यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. राऊत यांचे सहकार्य लाभले.
कॅन्सरवरील पाच शस्त्रक्रिया
सीपीआरमधील शल्यचिकित्साशास्त्र आणि दंतचिकित्साशास्त्र विभागाने गेल्या तीन वर्षांत कॅन्सरवरील अतिशय गुंतागुंतीच्या पाच शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये तोंड, जबडा, ओठांच्या कॅन्सरवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यातील शस्त्रक्रियेसाठी सहा ते आठ तास लागले असल्याचे डॉ. प्रियेश पाटील यांनी सांगितले.