इंचनाळ देवस्थान जमिनीचा वहिवाटदार नेमा
By admin | Published: December 11, 2015 09:34 PM2015-12-11T21:34:44+5:302015-12-12T00:10:54+5:30
‘स्वाभिमानी’ची मागणी : जिल्हाधिकारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीसाठी वहिवाटदार त्वरीत नेमावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इंचनाळ ग्रामस्थ व भाविकांनी जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.इंचनाळ येथील देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहाराच्या विरोधात ग्रामस्थ आणि भाविकांनी येथील प्रांताधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या सुनावणीअंती सहा वर्षांपूर्वी झालेली बेकायदेशीर फेरफार नोंद रद्द करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, इंचनाळ येथील जागृत देवस्थान व प्राचीन स्वयंभू गणपती देवस्थानाची पूजा-अर्चा दिवाबत्ती व देखभालीकरिता तत्कालीन राजे-महाराजे यांनी गट नं. २७३/१अ, २७३/१ब या मिळकती बाळकृष्ण गोपाळ भट-जोशी यांच्याकडे सोपविल्या होत्या. धर्मादाय आयुक्तांकडे या जमिनींची नोंद आहे.तथापि, वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांचे बंधू मनोहर यांनी सदर मिळकतीबाबत मिळालेल्या वटमुखत्यारपत्राच्या आधारे धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता आनंदा धोंडिबा पोवार यांना खरेदी देण्याचा बेकायदेशीर करार लिहून दिला आहे. या व्यवहाराची माहिती समजताच ग्रामस्थांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी पोवार यांनी जोशी यांच्या वारसांशी संगनमत करून आणि दिवाणी न्यायालयाची दिशाभूल करून हुकूमनामा मिळविला. त्याआधारे पीकपाहणी सदरी नाव लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यावरून ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वहिवाटदार मयत गजानन जोशी यांच्या वारसांनीही या जमिनीवरील वारसा हक्क स्वखुशीने सोडत असल्याचे पत्र दिले आहे. तक्रारीच्या सुनावणीअंती प्रांताधिकाऱ्यांनी देवस्थान इनाम खालसा करण्याची बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याबरोबरच पीकपाहणी सदरी असलेली नावे कमी करण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर, ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, धनाजी पाटील, प्रकाश मोदर, शिवाजी राणे, राजेंद्र देसाई, श्रीकांत भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
मागणी काय... आंदोलन का?
देवस्थानची देखभाल व
त्या जमिनीसाठी वहिवाटदार नेमण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व देवस्थान समितीकडे वेळोवेळी निवेदने, अर्ज-विनंत्या करण्यात आल्या आहेत.
मात्र, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच देवस्थान जमिनीसाठी वहिवाटदार नेमण्याची कार्यवाही १४ डिसेंबर २०१५ पर्यंत करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, उपोषण करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.