अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सांगाव आरोग्य केंद्र आजारी
By admin | Published: March 4, 2016 09:26 PM2016-03-04T21:26:22+5:302016-03-05T00:12:54+5:30
रुग्णवाहिकेचा चालक गायब : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन आरोग्य सेविकांची पदे रिक्त
बाबासाहेब चिकोडे -- कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेविका, एक आरोग्य सहायिका, अशी चार पदे गत आठ ते दहा महिन्यांपासून रिक्त आहेत. तर रुग्णवाहिकेचा चालक सहा महिन्यांपासून केंद्राकडे फिरकलाच नसल्याने हे प्राथमिक रुग्णालयच आजारी पडले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कसबा सांगावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजारांपर्यंत आहे. येथील आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ९ गावे, आठ उपकेंद्र व १५ आरोग्य सहायक व सहायिका आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत पंचतारांकित औद्योगिक वसाहत, दोन धरणग्रस्त वसाहती आहेत. त्यामुळे येथे दररोज सुमारे ९० ते १०० बाह्यरुग्ण तपासले जातात. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत; मात्र वैद्यकीय अधिकारी एस. व्ही. पाटील यांची बदली आठ महिन्यांपूर्वी झाली आहे. त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही, तर मुख्यालयातील आरोग्य सेविकेची बदली कागल येथे दहा महिन्यांपूर्वी झालेली आहे. तसेच दुसऱ्या आरोग्य सहाय्यिकेची बदली कागल येथे बी.एन.ओ. म्हणून पूर्ण वेळेकरिता सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाली आहे. या ठिकाणी १ जून २०१५ रोजी सेनापती कापशी प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत बेलेवाडी मासा उपकेंद्रातील कुसुमबी मुल्ला यांची बदली झाली आहे. मात्र, मुल्ला नऊ महिने होऊनही हजर झालेल्या नाहीत. तसेच सुळकूड उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची शिंगणापूर येथे पूर्ण वेळ प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यामुळे येथे एकूण चार जागा रिक्त आहेत.
सहा महिन्यांपूर्वी येथील रुग्णवाहिकेवर दशरथ शामराव तराळ यांची चालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, हजर झाल्यानंतर पुन्हा केंद्राकडे फिरकलेच नाहीत. रजा नामंजूर करून तसेच त्यांना कामावर हजर राहण्याची लेखी नोटीस पाठवून ते गैरहजर आहेत, त्यामुळे येथील रुग्णवाहिका बंद असल्याने गरोदर माता अत्यावश्यक रुग्णांना तालुका जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी येत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाचही जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
नोटिसीला दाद नाही
श्रीमती मुल्ला यांना हजर होण्यासाठी अनेक वेळा नोटिसा पाठवून तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही मुल्ला यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही त्या अद्याप या ठिकाणी हजर झाल्या नाहीत. तसेच चालक तराळ यांनाही नोटिसा व कारणे दाखवा नोटीस पाठवूनही त्यांनी यास दाद दिली नाही.