रेडझोनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलीच पाहिजेत, विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:23 PM2024-08-08T12:23:30+5:302024-08-08T12:23:59+5:30
कोल्हापूर महापालिकेला देणार सूचना
कोल्हापूर : कोल्हापुरातील महापुराला कारणीभूत ठरलेले पंचगंगा नदीकाठ परिसर तसेच जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रातील, ब्ल्यू लाइन, रेडलाइनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामे पाडलीच पाहिजेत त्याबाबतची सूचना कोल्हापूर महापालिकेला केल्या जातील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी दिली. यंदा महापुराचे योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी कोल्हापूरकरांच्या पूर व्यवस्थापन यंत्रणेला दाद दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. बैठकीनंतर पुलकुंडवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वी ज्या बांधकामांना परवानगी दिली गेली आणि नंतर तिथे ब्ल्यू लाइन व रेडलाइन झाली असेल, तर अशा कुटुंबांचे अन्यत्र पुनर्वसन करता येईल का किंवा त्यांना शहरात समाविष्ट करता येईल का, याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. मात्र, ब्ल्यू लाइन, रेड लाइन असतानाही बेकायदेशीर बांधकामे झाली असतील तर या अतिक्रमणांवर कारवाई झालीच पाहीजे. तशा सूचना महापालिकेला दिल्या जातील.
शहरांसोबतच गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नदीकाठावर अतिक्रमणे होत आहे या मोठ्या गावांची व्यापक बैठक घेऊन बेकायेशीर बांधकामे होणार नाहीत याबाबत सूचना द्या, असे त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सांगितले. कोल्हापूरला २०१९ व २०२१ साली ज्याप्रमाणे महापुराचा सामना करावा लागला तेवढी गंभीर परिस्थिती यंदा झाली नाही. अलमट्टीतून विसर्ग आणि कोल्हापूरकरांचे नियोजन यामुळे हे शक्य झाले.
राष्ट्रीय महामार्ग सोबत चर्चा करू..
पुणे-बेंगलोर महामार्गाचे विस्तारीकरण करत असताना भराव टाकून पूल उभारण्यापेक्षा पिलर टाकून पूल तयार करावा या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे; पण अंमलबजावणीत तसे दिसत नाही यावर पुलकुंडवार म्हणाले, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या नदी जोड प्रकल्प दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
व्यवस्थित माहिती द्या..
पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून बाधितांना वेळेत व विनासायास भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पंचनामे करताना बाधितांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती द्यावी, विशेषत: अधार, बँक खात्याची माहिती, मोबाइल क्रमांक अशी अत्यावश्यक माहिती अचूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.