कोल्हापुरातील कळंब्यात अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात
By उद्धव गोडसे | Updated: February 13, 2025 11:39 IST2025-02-13T11:37:34+5:302025-02-13T11:39:02+5:30
ताईगडे हिची डोळे दीपवणारी प्रगती; श्रद्धा हॉस्पिटल सील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा छापा

कोल्हापुरातील कळंब्यात अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात
कोल्हापूर : कळंबा येथील साई मंदिराजवळ श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला; तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांना वरणगे पाडळी (ता. करवीर) येथून ताब्यात घेतले. बुधवारी (दि. १२) ही कारवाई झाली. पथकाने संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या. दोन महिन्यांत दोन कारवाया झाल्याने जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली सुभाष ताईगडे (वय ४६, रा. साई मंदिरासमोर, कळंबा), सुप्रिया संतोष माने (४२, रा. रायगड कॉलनी, कळंबा) आणि धनश्री अरुण भोसले (३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) अशी ताब्यात घेतलेल्या तिघींची नावे आहेत. यांच्या अटकेची प्रक्रिया करून गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. याबाबत खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भिकाजी देशमुख आणि करवीर तालुका आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी दोन फिर्यादी दिल्या.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब्यातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बुधवारी करवीर पोलिसांच्या मदतीने डमी रुग्ण पाठवून सापळा रचला. डॉ. दीपाली ताईगडे हिने रुग्णाची तपासणी करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; तसेच काही वेळात गर्भलिंग तपासणीसाठी एक व्यक्ती मशीन घेऊन येईल असे सांगितले. अवैध प्रकार सुरू असल्याची खात्री पटताच आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत हॉस्पिटलमधून गर्भपाताच्या गोळ्यांची तीन पाकिटे जप्त केली. दिवसभर झडती घेऊन हॉस्पिटल सील करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यादेखील कारवाईदरम्यान उपस्थित होत्या. पोलिस उपनिरीक्षक स्नेहल टकले अधिक तपास करीत आहेत.
गोळ्यांची घरपोच सेवा
डॉ. ताईगडे हिच्याशी संबंधित असलेल्या दोन महिला मागणीनुसार गर्भपाताच्या गोळ्या घरपोच करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने डमी रुग्णाच्या नावे सुप्रिया माने आणि धनश्री भोसले या दोघींना फोन करून वरणगे पाडळी येथे बोलवून घेतले. तिथे त्यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी करताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गोळ्या कोणाकडून आणल्या, याचा शोध सुरू आहे.
३० हजारांत गर्भपात
गर्भलिंग तपासणी आणि गर्भपातासाठी डॉ. ताईगडे ही रुग्णांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये घेत होती. गर्भपाताच्या गोळ्या पाच हजार रुपयांना विकल्या जात होत्या, अशी माहिती आरोग्य विभागाच्या चौकशीत समोर आली.
सोनोग्राफी मशीनवाला पळाला
कारवाईची चाहूल लागताच सोनोग्राफी मशीन घेऊन येणारी व्यक्ती हॉस्पिटलकडे फिरकलीच नाही. त्याचा मोबाइल नंबर मिळाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्याला अटक करून मशीन जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताईगडे हिची डोळे दीपवणारी प्रगती
डॉ. ताईगडे हिने ‘बीएएमएस’ची पदवी घेतली आहे. सहा महिन्यांपूर्वी तिचे हॉस्पिटल साई मंदिरासमोरील टोलेजंग इमारतीत स्थलांतरित झाले. त्यापूर्वी याच परिसरात दुसऱ्या इमारतीत हॉस्पिटल सुरू होते. गर्भलिंग निदानातून तिने लाखो रुपये कमवल्याची परिसराची चर्चा सुरू आहे. ‘बीएएमएस’ पदवीधारक असल्याने तिला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणे, गर्भपात करण्याची परवानगी नाही. जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिलांचा सहभाग गंभीर
या गुन्ह्यात तीन महिलांचा सहभाग आहे. डॉ. ताईगडे हिने अनेक महिलांचे गर्भपात केल्याचा संशय आहे. सुप्रिया माने ही वृद्धांच्या सेवेचे काम करते. धनश्री भोसले ही घरकाम करते. या दोघी गर्भपाताच्या गोळ्या घरपोच करतात. त्यांना गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्यांनाही पोलिसांकडून अटक होणार आहे.
दोन महिन्यांत दुसरी कारवाई
फुलेवाडी रिंगरोड येथील बोगस डॉक्टरवर २० डिसेंबर २०२४ मध्ये कारवाई झाली होती. त्याचवेळी जोतिबा डोंगर आणि जुना बुधवार पेठ येथे कारवाई करून पथकाने सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या होत्या. गोळ्यांची विक्री करणारा गंगावेशीतील मेडिकलचालकही पोलिसांच्या हाती लागला. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दोन महिन्यांच्या आतच कळंबा येथे दुसरी कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.