कोल्हापुरातील अवैध गर्भलिंग प्रकरण: मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकून लावली विल्हेवाट, संशयित डॉ. ढेंगेची कबुली
By उद्धव गोडसे | Published: May 11, 2023 03:16 PM2023-05-11T15:16:09+5:302023-05-11T15:16:36+5:30
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
उद्धव गोडसे
कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राधानगरी पोलिसांच्या अटकेतील संशयित डॉ. प्रसाद शांताराम ढेंगे (वय ४२, रा. मडिलगे बुद्रूक, ता. भुदरगड) याने गर्भपातानंतर अनेक मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकल्याची कबुली दिली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन पुरवणारा ओंकार कराळे याच्यासह तीन संशयितांचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
राधानगरी पोलिसांनी गेल्या चार महिन्यात या गुन्ह्यात दोन पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, तीन दुचाकी, पाच मोबाइल, एक चारचाकी कार जप्त केली. तसेच एका बोगस डॉक्टरचा दवाखाना सील केला.
पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीपणे गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करणारे रॅकेट पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये उघडकीस आणले. त्यानंतर राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, दोन्ही गुन्ह्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राधानगरीत दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण २० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत.
त्यापैकी १७ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यातील डॉ. प्रसाद ढेंगे याने अनेक मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकून त्यांची विल्हेवाट लावली. गर्भपातानंतर तो मृत भ्रूण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवत होता. त्यानंतर गावाकडे जाताना नदीत फेकून देत होता. तीन भ्रूण नदीत फेकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. डॉ. ढेंगे याने नेमके किती भ्रूण नदीत फेकले, याची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
एजंट गाडेगोंडवाडीचा
याच गुन्ह्यातील एजंट राजेंद्र हिंदुराव यादव (वय ४२, रा. गाडेगोंडवाडी, ता. करवीर) यालाही पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली. त्याने किती महिलांना डॉक्टरांपर्यंत पोहोचवले? त्यापैकी किती महिलांची गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात झाले, याची चौकशी सध्या सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली.
तिघांचा शोध सुरू
या गुन्ह्यातील संशयित स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर), ओंकार कराळे आणि सनी कुसाळे या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. स्वप्निल पाटील याने गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे किट महिलांना पुरवल्याचे समोर आले आहे. ओंकार कराळे याने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन उपलब्ध केले. त्यामुळे या दोघांच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे.