कोल्हापुरातील धामणी नदीपात्रात अवैधरित्या मासेमारी, मृत माशांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:58 PM2022-11-17T16:58:27+5:302022-11-17T17:05:55+5:30
परिणामी, परिसरात गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महेश आठल्ये
म्हासुर्ली (कोल्हापूर): गेल्या चार दिवसापूर्वी अज्ञातानी धामणी नदीत अमानुष व अवैधरित्या केलेल्या मासेमारीमुळे अंबार्डे (ता.पन्हाळा) बंधाऱ्याच्या परिसरात हजारो मृत माशांचा खच पडला. यामुळे परिसरातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, परिसरात गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणी नदीवर सद्या ठीक ठिकाणी मातीचे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. आज आंबर्डे येथे काम सुरु असता नदी पात्रात मृत माशांचा खच दिसून आला. हे मासे पाण्याच्या प्रवाहाने गवशी - पाटीलवाडी (ता. राधानगरी) पासून आंबर्डे पर्यंत वाहत गेले आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी नदीपात्रात अज्ञातांकडून जिलेटिन स्फोट, टीसीएल पावडरचा वापर, तसेच विद्युत प्रवाहाच्या साह्याने मासेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडले.
या परिसरातील अनेक गावांची नळ पाणीपुरवठा जॅकवेल असून त्यातूनच गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.