जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारांचा मायाजाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:01 AM2018-03-19T01:01:08+5:302018-03-19T01:01:08+5:30

Illegal lenders in the district | जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारांचा मायाजाल

जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारांचा मायाजाल

googlenewsNext

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी खासगी सावकारांकडून लोक व्याजाने कर्ज घेत असतात; परंतु हे सावकार मनमानीपणे व्याज आकारून गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त करीत आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्याने खासगी सावकारांची दहशत नागरिकांच्या जिव्हारी आली आहे.
शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर खासगी सावकारांचे पेव फुटले आहे. गेल्या महिन्याभरात खासगी सावकारकीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या घटनांनी असंतोष निर्माण झाला असून सावकारकीचा फास जिल्ह्याभोवती आवळत आहे. त्याला वेळीच ठेचण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. खासगी सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. सुरुवातीस कर्ज परत करण्यासाठी तगादा लावला जात नाही; परंतु त्यानंतर त्यांना व्याजासह मुद्दल देण्यासाठी दमवून सोडले जाते. लोकांच्या असहायतेचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत.
दरमहा १५ ते २५ टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देतानाच कर्जदार पुन्हा कर्जाच्या खाईत सापडतो. ही वसुली करण्यासाठी सावकारांनी काही गुंडही पोसले आहेत. त्यांच्याकडून वेळप्रसंगी दमदाटी व मारहाणही केली जाते. त्यामुळे या सावकारांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नाहीत. खासगी सावकारीमध्ये काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. त्यांच्या विरोधात पोलीस कोणतीच कारवाई करीत नाही.
सावकाराची नोंदणी अशी होते
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सावकारी करण्यासाठी परवानगी मागितली जाते. तेथे परवाने दिले जाते. दरवर्षी संबंधित सावकारांनी परवाना नूतनीकरण करून घेणे आवश्यक असते. या नूतनीकरणाची फी २०० रुपये आहे. तसेच तपासणी फी म्हणून वर्षभरात झालेल्या मोठ्या व्यवहाराच्या एक टक्का रक्कमही भरून घेतली जाते. जिल्ह्यात २२५ सावकारांची नोंद आहे. पूर्वी वार्षिक १८ टक्के दराने कर्ज देण्याची परवानगी होती. हा व्याजदर आता कमी करून तो तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १५ टक्के आकारण्यास परवानगी आहे. मात्र सावकारांकडून दरमहा १० ते १५ टक्के दराने आकारणीहोते.
पाच हजारांचे २५ हजार!
बेकायदा सावकारीतून गडगंज झालेल्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. मनमानीपद्धतीने व्याजाची आकारणी करतात. ‘पैसे घेताना समजत नव्हते का?’ अशी या सावकारांची भाषा असते. ज्यांनी पाच हजार घेतले त्यांना वर्षभरात २० ते २५ हजार रुपये भरावे लागतात.
वसुलीसाठी डुकरांची भीती
कावळा नाका परिसरातील एका खासगी सावकाराने डुकरे पाळली आहेत. व्याज वसूल करण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याचे गुंड साथीदार उचलून आणतात. या ठिकाणी त्या व्यक्तीला अंगाला मीठ लावून डुकरांच्या खोलीत डांबून ठेवण्याची धमकी दिली जाते. हा सर्व थरार पाहून गर्भगळीत झालेली व्यक्ती कोऱ्या कागदावरही सही करण्यास तयार होते. अशा अनेक वेळा या ठिकाणी रंगीत तालमी झाल्या आहेत. या सावकाराविरोधात आतापर्यंत क्राइम ब्रँच किंवा शाहूपुरी पोलिसांचेही कारवाई करण्याचे धाडस झालेले नाही. या सावकाराचे कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील गूंड टोळ्यांशी लागेबांधे आहेत.

Web Title: Illegal lenders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.