कोथळीत अवैधरीत्या दारूचा बाजार
By admin | Published: April 4, 2016 12:45 AM2016-04-04T00:45:38+5:302016-04-04T00:45:38+5:30
दारूबंदीचा ठराव कागदावरच : शासनमान्य दुकान नसतानाही दारूची खुलेआम विक्री
संतोष बामणे ल्ल जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून कोथळी (ता़ शिरोळ) या गावाची ओळख आहे़ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावाला एक दिवसाआड अर्धा तास पाणी सुरू केले आहे़ याप्रमाणेच ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर झाला आहे़ मात्र, गावात एकही शासनमान्य दारूचे दुकान नसताना अवैधरीत्या दारू विक्री राजरोसपणे सुरू असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़
२६ जानेवारी २०१६ला झालेल्या ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत झाला होता़ त्याचबरोबर गावात एकही शासनमान्य दारूचे दुकान नसल्यामुळे कोथळी गावाने दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला आहे़ सध्या एक आदर्श गाव म्हणून वीज बचत, पाणी बचत, विविध योजना, ग्रामपंचायत निवडणुका, सोसायटी, पतसंस्था, विविध संस्था यांच्या निवडणुका बिनविरोध करून गाव एकजूट असल्याचा पुरावा सांगत आहे़ सध्या गावात वडाप बंद करून एस.टी. सेवा पूर्णपणे वापरात घेतल्यामुळे महामंडळापुढेही कोथळी गावाने आदर्श निर्माण केला आहे़
ग्रामसभेत झालेल्या दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला होता़ काही वर्षांपूर्वी गावातील महिलांनी एकत्र येऊन गावठी, देशी-विदेशी दारूची खुलेआम होणारी विक्री रोखण्यासाठी २००८ मध्ये आंदोलन छेडले होते़ गावातील सर्व अवैधरीत्या चालणारे दारूअड्डे उद्ध्वस्त केले होते़ मात्र, काही दिवसांनी छुपे-चोरी दारू विकण्याचे प्रकार वाढून आज गावात अवैधरीत्या दारूची सहा ते सात ठिकाणी सर्रास विक्री सुरू आहे़
येथे १ एप्रिलपासून उरुसाला सुरुवात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात दारूची मागणी लक्षात घेता अवैधरीत्या दारूविक्रेत्यांनी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात केल्याचेही समजते़ हा साठा मोडून काढण्यासाठी जयसिंगपूर पोलिस काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे़ ग्रामपंचायतीचा ठराव व कोणतीही होत नसलेली कार्यवाही त्यामळे पुन्हा एकदा दारूबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ तसेच कोथळी-जयसिंगपूर मार्ग, मंगेश्वर माळ, एस़टी़स्टॅण्ड, लक्ष्मीनगर व गावच्या मध्यवस्तीत अवैधरीत्या दारूची खुलेआम विक्री होत असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्तहोत आहे़
प्रशासनाचे दुर्लक्ष
कोथळी येथे शासनमान्य दारूचे एकही दुकान नाही़ असे असताना सध्या गावात अवैधरीत्या सहा ते सात ठिकाणी खुलेआम दारूची विक्री होत आहे़ मात्र, या अवैधरीत्या होणाऱ्या दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होऊन अवैध दारू विक्रीला वाव मिळाला आहे़ मात्र गावात दारूबंदीसाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
२६ जानेवारीच्या ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव केला आहे़ ग्रामपंचायतीचा ठराव पोलिस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली होती़ मात्र, पुन्हा एक दा अवैध दारू विक्र ीने उभारी घेतली आहे़ तर यावर निर्बंध घालण्यासाठी सर्व सदस्यांचे मत घेऊन पोलिस ठाण्याला पुन्हा एकदा निवेदन देणार आहेत़
- सुप्रभा इंगळे, सरपंच कोथळी