इचलकरंजीत बेकायदेशीर दारूची सर्रासपणे विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:32+5:302021-05-14T04:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात अनेक चिंचोळ्या व अडचणीच्या ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी व देशी-विदेशी दारूची सर्रासपणे विक्री सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात अनेक चिंचोळ्या व अडचणीच्या ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी व देशी-विदेशी दारूची सर्रासपणे विक्री सुरू आहे. तेथे चारचाकी गाडी जात नसल्याने दारूविक्री वाढतच आहे. शासनाने पोलीस दलास नव्याने दिलेल्या ई-बीट मार्शल बाईक या अडचणीच्या ठिकाणी घेऊन जाता येतात. त्याच्या साहाय्याने अंतर्गत सुरू असलेली दारूविक्री पूर्णपणे बंद पाडावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
इचलकरंजी शहरात अनेक परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. शहरामध्ये चिंचोळ्या व अडचणीच्या ठिकाणी बेकायदेशीर हातभट्टी दारूविक्री सुरू आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या बार, हॉटेल व परमिट रूमवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ते हॉटेल सील करण्यासंदर्भात नगरपालिकेस प्रस्ताव पोलिसांमार्फत पाठविला आहे.
दरम्यान, पालिकेने त्यांच्याअंतर्गत येत असलेल्या एका हॉटेलवर कारवाई केली असून, इतर दोन हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तिन्ही पोलीस ठाण्यांमध्ये ई-बीट मार्शल बाईक दिली असून, त्याचा वापर पोलिसांकडून होणे गरजेचे आहे. पोलिसांचा धाक राहण्यासाठी सध्या कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.
चौकट सुरुवातीला कारवाई ; सध्या बंद
काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी फिरणाऱ्यांना समज देत रस्त्यासह विविध चौकांत होणारी गर्दी याठिकाणी ई-बीट मार्शल बाईकवरून प्रमुख मार्गांसह गल्ली-बोळात फेरफटका मारून पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी नियम पाळण्याचे आवाहन करत सहाजणांवर कारवाई केली होती. त्यानंतर ही कारवाई सध्या बंदच आहे.