सरुड गावात बेकायदेशीर दारूविक्री खुलेआम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:47+5:302020-12-06T04:25:47+5:30
अनिल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क सरूड : तीन वर्षांपूर्वी दारूबंदी घोषित झालेल्या सरुड गावात सध्या राजरोसपणे बेकायदेशीररीत्या दारू विक्री ...
अनिल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : तीन वर्षांपूर्वी दारूबंदी घोषित झालेल्या सरुड गावात सध्या राजरोसपणे बेकायदेशीररीत्या दारू विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाने दारू विक्रीला चाप लावावा, अशी मागणी महिलांसह नागरिकांमधून होत आहे.
ऑगस्ट २०१७ मध्ये सरूड येथील रणरागिणींनी गावात दारूबंदीसाठी एल्गार पुकारला होता. यावेळी दारूबंदीविषयी गावातील महिलांमध्ये जनजागृती झाली होती. दारूबंदीसाठी गावातील बहुतांश महिलांच्या सह्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर शासन प्रक्रियेनुसार सप्टेंबर १७ मध्ये गावात दारूबंदी झाली. यानंतर गावातील सर्व दारू दुकाने बंद केल्याने गेली दोन ते अडीच वर्षे गावात पूर्णपणे दारू विक्री बंद होती. मात्र, मार्च महिन्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळापासून गावात हा बेकायदेशीररीत्या देशी, तसेच विदेशी दारूची विक्री होऊ लागली. सुरुवातीच्या काळात पडद्याआडून होणारी ही बेकायदेशीर दारू विक्री सध्या राजरोसपणे खुलेआम होऊ लागली आहे. बाजारपेठेतील मटण मार्केट परिसर, पाण्याची टाकी, बिरदेव माळ परिसरासह नवा रस्ता, एस .टी. स्टँड येथेही बेकायदेशीर दारू विक्री सुरू असते. याकडे पोलीस प्रशासनाने गांधारीची भूमिका घेत कानाडोळा केल्याने महिला वर्गासह सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गावातील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
x चौकट x
= तळीरामांची सोय = सरूड गावात दारुबंदी झाल्यानंतर गावातील तळीरामांना दारूसाठी बांबवडे, कापशी, सागांव, आदी गावांत जावे लागत होते. परंतु, सध्या गावात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे तळीरामांना गावातच सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने त्यांची चांगलीच सोय होत आहे.