मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी-श’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:36 PM2020-04-14T16:36:37+5:302020-04-14T16:52:07+5:30
पोलिसांनी वेळोवेळी सांगितले; पण नागरिक बेजबाबदारपणे वागून रस्त्यावर विनाकारण भटकत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता
कोल्हापूर : ‘बाहेर पडला, त्याला कोरोना नडला’ अशा पद्धतीने मृत्यूचे भय वाटावे यासाठी करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पुढाकाराने प्रबोधनाची नवी पद्धत अवलंबली आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना जरब बसविण्याचीही सोय केली आहे. अशा बेजबाबदार नागरिकांसाठी आता ‘घराबाहेर पडाल तर मृत्यूला कवटाळाल’ असाच संदेश देत कळंबा (ता. करवीर) येथे मंगळवारपासून एक ‘सेल्फी पॉइंट’ उभारला आहे. तेथील ‘मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी’श’ हा उल्लेख साऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी वेळोवेळी सांगितले; पण नागरिक बेजबाबदारपणे वागून रस्त्यावर विनाकारण भटकत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पुढाकाराने हा सेल्फीचा प्रभावी उपक्रम सुरू केला आहे.
करवीर विभागात कोल्हापूर ते गारगोटी या मुख्य मार्गावर कळंबा येथे ‘सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक’ हा सेल्फी पॉइंट उभा केला आहे. विनाकारण फिरणाºयांना पकडून आणून तेथे पुष्पहार घालून सेल्फी काढले जातात. त्या सेल्फी पॉइंटवर ‘मी बेजबाबदार, मी ‘सेल्फी’श’, बाहेर पडाल तर कोरोना नडाल’ अशी प्रबोधनात्मक वाक्ये लिहिली आहेत. तो घराबाहेर पडणार नाही हाच पोलिसांचा उदात्त हेतू आहे. अनंत खासबारदार आणि अविनाश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना साकारली आहे.
सेल्फी विथ गुन्हाही
बेजबाबदार नागरिकाचा या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढल्यानंतर त्याच्यावर पोलीस ठाण्यात लॉकडाऊन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हाही नोंदविला जाणार आहे.
मुरगूड, गांधीनगरातही उपक्रम
कळंब्यापाठोपाठ करवीर पोलीस उपविभागातील मुरगूड, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, आदी ठिकाणीही अशा पद्धतीचे सेल्फी पॉइंट उभारणार असल्याचे उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सांगितले.