आव्हानाला घाबरणारा मी नाही, सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:02 PM2024-03-14T12:02:46+5:302024-03-14T12:03:40+5:30
'उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही'
कोल्हापूर : मी तुमच्या आव्हानाला घाबरणारा नाही. जर तीन महिन्यांपूर्वी आव्हान दिले असते तर त्याला उत्तर दिले असते. आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चा, निर्णय आता पुढे गेले आहेत. लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनता विरुद्ध महायुती अशा होणाऱ्या निवडणुकीत तुमच्या आव्हानाचे उत्तर मिळेल, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावून लावले.
महाविकास आघाडीने सामूहिकपणे श्रीमंत शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू छत्रपतींच्या उमेदवारीचा विषय बराच पुढे गेला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी जर मला आव्हान दिले असते तर त्याला जरूर उत्तर दिले असते. सतेज पाटील असल्या आव्हानांना घाबरणारा नाही, असे पाटील यांनी सांगितले.
हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल असे विचारता पाटील यांनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा का, याची चर्चा आघाडीच्या बैठकीत झाली आहे. परंतु याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ते अंतिम निर्णय घेतील असे चर्चेतून ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही
संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत छेडले असता, त्यांच्या उमेदवारीबाबत मी काय सांगणार, असे म्हणत सतेज पाटील यांनी सांगितले की, महायुतीत अनेकांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे मी आता कोणावर टीका करणार नाही. उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही. त्यामुळे संजय मंडलिक पक्षाकडून उभे राहणार की अपक्ष उभे राहणार याबाबत मला काही कल्पना नाही. त्यावर मी आत्ताच भाष्यही करणार नाही.
ठेकेदारांना काम हाच शक्तिपीठचा अजेंडा
शक्तिपीठ महामार्ग करण्याची कोणाचीही मागणी नाही. धार्मिक नाव देऊन शेतकऱ्यांची शेतजमीन रस्त्यांसाठी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. कंत्राटदारांना कामे देणे हाच शक्तिपीठ महामार्गाचा अजेंडा आहे, असा आरोप पाटील यांनी केला.