मी घट्ट आहे, काळजी करू नका-: धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:34 AM2019-01-23T00:34:34+5:302019-01-23T00:34:56+5:30
अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले
कोल्हापूर : अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्टवादीची परिवर्तन यात्रा सोमवारी (दि.२८) कोल्हापुरात येत आहे. तिच्या तयारीसाठी मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. सभेसाठी माणसे आणण्यापासून दसरा चौकातील नियोजन आपण करतो, असे खासदार महाडिक यांनी सांगितले; पण ‘शहरातील होर्डिंग्जची जबाबदारीही आपण घ्या,’ असा चिमटा ए. वाय. पाटील यांनी काढला. यावर ‘अध्यक्षसाहेब, काळजी करू नका; मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी टाका, मी पेलतो,’ असा टोला महाडिक यांनी हाणला. सोमवारी (दि. २८) होणाऱ्या सभेच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश संपूर्ण राज्यात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही महाडिक यांनी केले.
ए. वाय. पाटील म्हणाले, भाजपला सामान्य माणूस कंटाळला आहे. हे सरकार उलथवून लावल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कोल्हापुरातील दोन्ही खासदार कशाही परिस्थितीत निवडून आणणारच, अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी.
शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ए. वाय. पाटील यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. महापौर सरिता मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, नेताजी पाटील, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर, सुनील देसाई, आदी उपस्थित होते.
लाटकर, फरास ताकदीची माणसे
सभेसाठी शहरातून किती माणसे आणणार याची माहिती आर. के. पोवार यांनी दिली; पण राजेश लाटकर व आदिल फरास कोठे आहेत, ती ताकदीची माणसे असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
गर्दी वाढणार
‘भीमा कृषी’ प्रदर्शनाला येण्याचे आवाहन करत महाडिक म्हणाले, गेल्यावेळेला नऊ कोटींचा एक रेडा होता; त्यामुळे दोन लाखांनी गर्दी वाढली. आता दोन रेडे आणि बैल आणल्याने गर्दी दुप्पट होईल.
‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल धनंजय महाडिक यांचा मंगळवारी ए. वाय. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयकुमार शिंदे, आर. के. पोवार, महापौर सरिता मोरे, अनिल साळोखे, आदी उपस्थित होते.