राज्याच्या मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे पंचगणगेत विसर्जन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:43 PM2020-09-15T15:43:52+5:302020-09-15T15:46:09+5:30
सीपीआर समोरील न्यायालयाची जुनी इमारत कोवीड सेंटरसाठी देण्यास राज्य शासनाने स्पष्ट नकार दिला. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती संतप्त झाली असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे उद्या, बुधवारी पंचगंगा नदीत विसर्जन करणार या घटनेचा निषेध करणार आहे.
कोल्हापूर : येथील सीपीआर समोरील न्यायालयाची जुनी इमारत कोवीड सेंटरसाठी देण्यास राज्य शासनाने स्पष्ट नकार दिला. कोणत्याही कारणांसाठी ती इमारत मागू नये असे सोमवारी राज्याचे मुख्य सचीव संजयकुमार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई सोमवारी पाठवलेल्या आदेशात म्हंटले आहे. यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती संतप्त झाली असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे उद्या, बुधवारी पंचगंगा नदीत विसर्जन करणार या घटनेचा निषेध करणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीपीआर समोरील जिल्हा व सत्र न्यायालयाची सिमेंट कॉक्रीटची जुनी इमारत कोवीड सेटरसाठी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली होती. त्यावेळी जिल्हा न्यायालयाने नकार दिला होता.
याबाबत दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी दि. १३ ऑगष्ट रोजी पुन्हा जिल्हा न्यायालयाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यांनी योग्य तो अभिप्रायानुसार उच्च न्यायालयातील बांधकाम समितीकडे पाठविला. यामध्येही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने त्यांचे मत दिले आहे होते.
दरम्यान, कोविड सेंटरसह कोणत्याही कारणासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे न्यायालयाच्या जुन्या इमारतीची मागणी करू नये, असे सोमवारी राज्याचे मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी देसाई यांना आदेश दिले. कोरोना संसर्गाच्या उपचाराअभावी अनेक बाधितांना आपला प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालये कमी पडत आहेत.
म्हणून सी.पी.आर.हॉस्पिटलला लागून असणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या वापराविना असणाऱ्या जुन्या इमारती कोरोना संसर्गाच्या काळात सी.पी.आर. रुग्णालयाकडे ऑक्सीजन सुविधेच्या उपचार केंद्रांसाठी द्याव्यात अशी मागणी आहे.
पण शासनाचे आडमुठे धोरण आडवे येत आहे. त्यांना मानवी जीवांच्या रक्षणाची काळजी नाही म्हणून इतकी गंभीर स्थिती असताना सुध्दा अद्याप रिकाम्या पडलेल्या इमारती उपचारासाठी
दिलेल्या नाहीत आणि भरीत भर म्हणजे न्याय व विधी विभागाला मानवी जीवांचे काहीच देणे-घेणे नाही, अशा अविर्भावात राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही जुनी कोर्ट इमारत कोविड सेंटरसाठी देता येणार नाही असे पत्र पाठवून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याचे सचिव संजयकुमार यांच्या या बेजबाबदार कृत्याबद्दल याचा निषेध म्हणून त्यांचे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी दुपारी १२ वा. १५ मिनीटानी पंचगंगा नदीवरील घाटावर जेथे गणेशमुर्ती विर्सजन केले जाते, त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, अंजुम देसाई, संभाजी जगदाळे, बाबा देवकर, सुभाष देसाई, विनोद डूनूग आदी उपस्थित राहणार आहेत.