पसंती दिल्यास १२ हेक्टर जमिनीचे तत्काळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:30 AM2021-08-18T04:30:19+5:302021-08-18T04:30:19+5:30
गडहिंग्लज : आंबेओहोळ लाभक्षेत्रातील १२ हेक्टर जमीन प्रकल्पग्रस्तांच्या वाटपासाठी उपलब्ध आहे. त्याला प्रकल्पग्रस्तांनी पसंती दिल्यास त्याचे तत्काळ वाटप करण्यात ...
गडहिंग्लज :
आंबेओहोळ लाभक्षेत्रातील १२ हेक्टर जमीन प्रकल्पग्रस्तांच्या वाटपासाठी उपलब्ध आहे. त्याला प्रकल्पग्रस्तांनी पसंती दिल्यास त्याचे तत्काळ वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात प्रकल्पग्रस्तांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, पाटबंधारे उपअभियंता दिलीप खट्टे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, कॉ. शिवाजी गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या काही जमिनीवर स्थगिती आहे. ती उठवण्यासाठी आपण पाठपुरावा करू, तसेच उपलब्ध १२ हेक्टर जमिनीला पसंती दिल्यास त्याचे लगेच वाटप करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही निर्णय कायदेशीर असले तरी ते आयुक्त व मंत्रालय पातळीवर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करून तेही मार्गी लावले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भूखंड वाटप व संकलन दुरुस्ती यासह प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
बैठकीस बजरंग पुंडपळ, सचिन पावले, सागर सरोळकर, महादेव खाडे, राजू देशपांडे आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
चौकट : प्रांताधिकाऱ्यांनी शब्द पाळला १२ ऑगस्टला जलसमर्पण आंदोलन करण्याचा इशारा आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी दिला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी वाघमोडे यांनी दिले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पुढचा बुधवार (दि. २५) राखून ठेवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळी : गडहिंग्लजचे नूतन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांचे आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. शिवाजी गुरव, बजरंग पुंडपळ, सचिन पावले आदी उपस्थित होते.
क्रमांक : १७०८२०२१-गड-०९