अंबाबाई मंदिर कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा - प्रकाश आबिटकर : मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:32+5:302020-12-13T04:37:32+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचे चांगले व्यवस्थापक व्हावे यासाठी २०१८ मध्ये विधानसभा विधेयक क्र. ३३ पारित केले ...
कोल्हापूर : राज्य शासनाने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचे चांगले व्यवस्थापक व्हावे यासाठी २०१८ मध्ये विधानसभा विधेयक क्र. ३३ पारित केले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, श्री अंबाबाई मंदिर महाराष्ट्रासह भारतातील शक्तिपीठांपैकी एक असून येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांना सेवासुविधा पुरविणे गरजेचे असून त्यासाठी कोल्हापुरात २०१७ साली मोठे जनआंदोलन निर्माण झाले होते. याबाबत मी स्वत: राज्यातील इतर विविध मंदिरांसाठी जसा एक मंदिर - एक कायदा आहे, त्याच धर्तीवर अंबाबाई मंदिरासाठीसुद्धा वेगळा कायदा करून मंदिराचे व्यवस्थापन सुरळीत होण्याकरिता विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर तत्कालीन विधि व न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापन विधेयक २०१८ राज्यपालांच्या संमतीने पारित केले आहे. या विधेयकाची अंमलबजावणी झाल्यास राज्य शासनाला मंदिराच्या विकासासाठी वेगळा निधी देण्याची गरज नाही. या मंदिरातून सध्या १८ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न होत असून हेच उत्पन्न कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. यातून मंदिराची विकासकामे व प्रशासनासाठीचा खर्च करता येईल. तरी या कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करावी. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवत तत्काळ विधेयक तपासून कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित विभागाला दिले.
---
फोटो नं १२१२२०२०-कोल-अंबाबाई निवेदन
फोटो ओळ : शनिवारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंबाबाई मंदिरासंबंधी कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन दिले.
--
इंदुमती गणेश